आवक वाढल्याने भाव अटोक्यात
| चिपळूण | वृत्तसंस्था |
दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या असल्या तरी पर्यटक अजूनही पर्यटनासाठी येत आहेत. त्यांच्याकडून समुद्रातील ताज्या मासळीची मागणी होत आहे. सध्या मासळी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे ग्राहक समाधानी आहेत.
खोल समुद्रात सध्या मच्छीमारांना मोठ्या प्रमाणात मासळी सापडत आहे. आवक वाढल्याने मासळीचे भाव आटोक्यात असल्याने खरेदीसाठी गर्दी होत आहे. मासळीची आवक कमी असल्याने गेल्या काही दिवसांपासून दर वाढले होते. आता मुबलक प्रमाणात मासळी उपलब्ध होत असल्याने दर स्थिरावले असून, ताजा माशांवर खवय्ये ताव मारत आहेत. थंडी वाढताच पर्यटन हंगाम सुरू होतो. सध्या पर्यटक मोठ्या संख्येने चिपळूण, गुहागर, दापोली परिसरात येत असून, स्थानिक खाद्यपदार्थाला पसंती दर्शवत आहेत. हे पर्यटक येथे आल्यानंतर जेवणामध्ये मासळीला प्राधान्य देत आहे. त्याशिवाय परतीच्या मार्गावर असताना सोबत कोळंबी, सुरमई, रावस, टोळ, कर्ली, घोळ व पापलेट आदी मासे विकत घेऊन घरी जात आहे. पाटण, कराड, सांगली, सातारा, कोल्हापूर येथून कुंभार्ली घाटमार्गे येणारे पर्यटक घरी जाताना चिपळूणमधून मासे विकत घेऊन जात आहेत.
मासळी दर प्रतिकिलो
बोंबिल – 300 रुपये,
पापलेट मध्यम – 600
पापलेट मोठे – 1000
सुरमई – 700
घोळ – 800
रावस – 800
मांदेली – 150
कोळंबी – 400
बांगडा मालवणी – 300
हलवा – 500
टोळ – 400







