| पनवेल | प्रतिनिधी |
वैजापूर येथील रोहित पठारे हत्या प्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच, या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि मानवाधिकार आयोगामार्फत करण्यात यावा, अशी मागणी पनवेल जिल्हा काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वैजापूर शहरात रोहित पठारे यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली असून, हत्येपूर्वी जातीयवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. ही घटना अत्यंत गंभीर असून, पुरोगामी महाराष्ट्रात जातीय द्वेषातून अशा प्रकारच्या घटना घडणे चिंताजनक असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. या प्रकरणात पोलिसांकडून झालेल्या कथित दिरंगाईमुळे अनेक आरोपी फरार होण्यास यशस्वी झाल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. पोलिसांनी वेळीच कठोर कारवाई केली असती, तर आरोपींना पळून जाण्याची संधी मिळाली नसती, असे पवार यांनी नमूद केले आहे.
फरार आरोपींना अटक करण्याची मागणी
