| माथेरान | प्रतिनिधी |
क्रांतिज्योत महिला विकास फाऊंडेशनतर्फे पनवेल शहरात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने भव्य सभागृह व भवन उभारण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन पनवेल महानगरपालिकेचे मा. उपायुक्त कैलास गावडे यांना सादर करण्यात आले.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद केले की, शिक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे पनवेल शहरात अद्याप कोणतेही सभागृह किंवा स्मारक भवन उभारण्यात आलेले नाही. शिक्षण प्रसारासाठी ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. दलित, शोषित आणि वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. या महान समाजसुधारकांच्या सन्मानार्थ पनवेलमध्ये महापालिकेने योग्य भूखंड निश्चित करून ठराव मंजूर करावा आणि त्यांच्या नावाने भव्य सभागृह उभारावे, अशी संस्थेची मागणी आहे. सदर अर्जाची दखल घेऊन यावर तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती संस्थेच्यावतीने करण्यात आली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. रुपालीताई शिंदे, सौ. स्नेहा धुमाळ, सौ. प्रिया गंगावणे, सौ. ज्योती तातरे, सौ. सुषमा मयेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सभागृह उभारण्याची मागणी
