। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान शहरात प्रवेश करतो त्या भागात मिनी ट्रेन रेल्वे मार्गाच्या बाजूला अमन लॉज परिसरात बिबट्याचे दर्शन शनिवारी (दि. 17) रात्री अनेक पर्यटकांना झाले. रात्रीच्या सुमारास मिनी ट्रेनच्या रुळाशेजारी असलेल्या लोखंडी खोक्यावर हा बिबटा आरामात पहुडला होता. मात्र, त्यावेळी खबरदारी न घेता अनेक पर्यटक यांच्याकडून स्वतः जीव धोक्यात घालून फोटो सेशन केले जात होते. दरम्यान, माथेरानमध्ये वेगवेगळ्या बिबट्याचे दर्शन होत असून स्थानिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये असे आवाहन वन विभागाने केले आहे.
याआधीही दर्शन
हा काही पहिलाच प्रकार नाही. याआधी देखील माथेरानचे स्थानिक नागरिक महेंद्र जाबरे यांना माथेरानच्या घाटात बिबट्या दिसला होता. तसेच काही दिवसांपूर्वी देखील माथेरानच्या जंगल परिसरात दोन-तीन वेळा बिबट्याचे दर्शन झाल्याच्या घटना घडल्या आहेत. माथेरान हे घनदाट जंगल क्षेत्र असून, येथे बिबट्याचा नैसर्गिक अधिवास आहे.
माथेरान शहरातील इको पॉईंट परिसरातील हनिमून पॉईंट येथे बिबट्याने मध्यरात्री येऊन कुत्र्यावर हल्ला केला होता. त्या सर्व प्रकारचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.
वनविभागाचे आवाहन
वनविभागाने माथेरानमध्ये जागोजागी जनजागृतीचे फलक लावले आहेत. पर्यटकांनी या फलकांवरील नियमांचे पालन करावे. जंगल परिसरात एकटे फिरणे, रात्रीच्या वेळी फिरणे टाळावे. बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाऊ नये, फोटो काढण्याचा प्रयत्न करू नये. वन विभागाच्या नियमांकडे दुर्लक्ष करू नये असे आवाहन वनक्षेत्रपाल गायकवाड यांनी केले आहे.







