| नेरळ | वार्ताहर |
नेरळ शहरात भरवण्यात येत असलेला बुधवार आठवडी बाजार कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी नेरळ व्यापारी वर्गाकडून करण्यात आली. यासाठी नेरळ ग्रामपंचायत सरपंच तसेच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांच्याकडे एक निवेदन व्यापारी वर्गाकडून देण्यात आले आहे. बुधवार आठवडी बाजारात चोरीचे प्रमाण वाढले असून महिलांचा सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच परप्रांतीय हातगाड्याधारकांमुळे वाहतूक कोंडी, व्यापार्यांनाच अरेरावेची भाषेमुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने हा बाजार बंद व्हावा ही मागणी पुढे आली आहे.
नेरळ शहरात भर रस्त्यावर अनेक वर्षांपासून दर बुधवारी सकाळपासून आठवडा बाजार भरतो. मात्र, या बाजारात परप्रांतीय विक्रेते भाजी, खाद्यपदार्थ सोडून वेगवेगळ्या वस्तू विक्रीसाठी ठेवतात. यामुळे येथील फूटपाथ आणि रस्ता या बाजारामुळे व्यापून जातो. या आठवडा बाजारामुळे अरुंद रस्ता आणखीनच अरुंद होत चालला असून येथे चालणे देखील कठीण होत चालले आहे. शिवाय या गर्दीचा येथील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. बाजारात होणार्या गर्दीचा फायदा घेऊन चोरीचे प्रकारदेखील घडतात. यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण झाली आहे. मंगळसूत्र चोरी, पाकीटचोरी असे प्रकार अनेक वेळा या बाजारात घडले आहेत.
त्यामुळे येथील व्यापारी वर्गाने नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी तर नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांची भेट घेत नेरळ बुधवारचा आठवडी बाजार कायमस्वरूपी बंद करावा अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. निवेदन देते वेळी नेरळ व्यापारीफेडरेशनचे अध्यक्ष मनोहर अहिरे, प्रीतम गोरी, विशाल साळुंके, जैद नजे, रवी कटारिया, रवी जैन, पंढरी हजारे, संजू जैन यासंह अनेक व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.