| सुतारवाडी | प्रतिनिधी |
भिरा फाटा ते विळे दरम्यान गतिरोधकांवर गतिरोधक दर्शक पट्ट्या नसल्यामुळे अनेक वाहनांची आदळा आपट होत असते. या दरम्यान बारा गतिरोधक आहेत. मात्र, अनेक महिन्यांपासून या गतिरोधकांवर गतिरोधक दर्शक पट्ट्या नाहीत. यामुळे विशेषता दुचाकी वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अन्य वाहनांची या ठिकाणावरून जाताना मोठ्या प्रमाणात आदळा आपट सातत्याने होत असते. सुतारवाडी येथून पुणे अंतर केवळ शंभर किलोमीटर आहे त्यामुळे येथून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या परिसरातून मोठमोठ्या टनाच्या कॉइल घेऊन जाणारे ट्रेलर सुद्धा सातत्याने ये-जा करत असतात. सुतारवाडी आणि अन्य परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर फार्म हाऊस असल्यामुळे वर्षभर पर्यटक येत असतात. विळा परिसरात मोठ्या कंपन्या असल्यामुळे कच्चामाल घेऊन येणारे आणि पक्का माल घेऊन जाणारे त्याचप्रमाणे म्हस्करवाडी ते ढोकळेवाडी दरम्यान सात खडी क्रेशर व एक डांबर प्लांट आहे. तेथून खडी नेण्यासाठी अनेक डंपर सातत्याने धावत असतात. काही ठिकाणचे गतिरोधक तर सपाट झालेले आहेत. पावसाळ्यामध्ये हे गतिरोधक दिसत नसल्यामुळे दुचाकी वाहन चालकाचे अपघात. झालेले आहेत. त्यामुळे या परिसरामध्ये लवकरात लवकर गतिरोधक दर्शक पट्ट्या बसण्याची मागणी अनेक नागरिकांनी केली आहे.
रस्त्यावरील गतिरोधकांना पांढऱ्या पट्ट्या बसविण्याची मागणी
