| पाताळगंगा | प्रतिनिधी |
गेल्या बारा वर्षांपासून बंद असलेला कालवा पुन्हा सुरू करून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी ग्रुप ग्रामपंचायत माजगाव आणि ग्रामस्थांच्यावतीने कर्जत येथील वरिष्ठ लिपिक पाटबंधारे विभाग अधिकारी भगवान कदम यांना निवेदन देण्यात आले. कालव्याचे पाणी लवकरात लवकर उपलब्ध झाल्यास परिसरातील शेतीला नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
खरसुंडी येथील बंधाऱ्यातून कालव्याद्वारे पौध, माजगाव, आंबिवली आणि वारद या गावांपर्यंत पाणी पोहोचत होते. या पाण्याच्या माध्यमातून पूर्वी परिसरात मोठ्या प्रमाणावर भातशेती केली जात होती. मात्र, गेल्या बारा वर्षांपासून कालवा बंद असल्याने शेकडो हेक्टर जमीन पाण्याअभावी पडीक पडली आहे. परिणामी, शेतीचे नुकसान होत असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. यंदा उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. कालव्याला पाणी सुरू झाल्यास भातशेतीला पुन्हा चालना मिळेल, परिसर हिरवागार होईल आणि पाणीटंचाईचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होईल. यासाठी ग्रामस्थांनी सकारात्मक भूमिका घेत प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. दरम्यान, कालव्याची दुरवस्था आणि अतिक्रमणांची पाहणी करून योग्य नियोजनाद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचविण्याचे आश्वासन पाटबंधारे विभागाकडून देण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी मा. सरपंच गोपीनाथ जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जयवंत पाटील, मा. उपसरपंच राजेश पाटील, नरेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते मारुती ढवालकर, एस के. कांबळे, गौतम कांबळे, जयेश पाटील, रणधीर पाटील, अतुल लबडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.






