| खांदेश्वर | प्रतिनिधी |
पनवेल महापालिका हद्दीत गटारींवरील झाकणांच्या कामावर होणाऱ्या खर्चाबाबत प्रश्न उपस्थित होत असतानाच नवीन पनवेल सेक्टर 11 मधील मिराज सिनेमासमोरील गटारीचे झाकण उघडे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पादचारी, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाने या प्रकाराकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात गटारींवर झाकणे बसविण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, दुसरीकडे गटारी उघड्या अवस्थेत दिसत असल्याने या कामांची गुणवत्ता आणि देखभाल याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. गटारींच्या झाकणांच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला असून, संबंधित माहिती मिळविण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्याचेही सांगितले जात आहे. या आरोपांची सत्यता तपासणे आवश्यक असले, तरी प्रत्यक्षातील उघड्या गटारींची समस्या दुर्लक्षित करून चालणार नाही. नवीन पनवेलमधील मिराज सिनेमासमोरील गटार उघडे असल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अंधारात किंवा पावसामुळे गटार लक्षात न आल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.






