नदी उशाला, तरी रोहेकरांची तहान कायम; मैलामिश्रित पाण्यामुळे नागरिकआक्रमक
| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्याला बारमाही वाहणाऱ्या कुंडलिका नदीचे वरदान लाभले असतानाही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. एका बाजूला पाणीटंचाईमुळे काही गावांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे, तर दुसरीकडे धाटाव औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाणी आणि रोहा शहरासह आसपासच्या गावांतील सांडपाणी नदीत मिसळत असल्याच्या तक्रारींमुळे कुंडलिका नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नदीकाठी राहूनही शुद्ध पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ नागरिकांवर आल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
रोहा-अष्टमीला जोडणाऱ्या कुंडलिका नदीवरील पुलावरून पाहिल्यास नदीच्या पाण्याच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. धाटाव औद्योगिक क्षेत्रातून बाहेर पडणारे रासायनिक सांडपाणी तसेच शहरातील घरगुती सांडपाणी नदीत मिसळत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या प्रदूषणामुळे नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेवर, जलचरांवर आणि संपूर्ण नैसर्गिक परिसंस्थेवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तालुक्यात कुंडलिकेसारखी नदी उपलब्ध असतानाही काही गावांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागत असल्याचे चित्र आहे. एका बाजूला नदीचे पाणी समुद्राकडे वाहून जात असताना दुसरीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे जलस्रोतांचे नियोजन, पाणी साठवणूक आणि सुरक्षित पाणीपुरवठा यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. धाटाव औद्योगिक क्षेत्रातील सांडपाण्यावर निर्धारित निकषांनुसार प्रक्रिया केली जाते का, प्रक्रिया यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत आहेत का आणि रोहा शहर व आसपासच्या गावांतील सांडपाण्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जाते का, याची संबंधित यंत्रणांनी सखोल तपासणी करणे गरजेचे आहे.
कुंडलिका नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी ठोस कृती आराखडा कधी तयार होणार? नदीत मिसळणाऱ्या औद्योगिक आणि घरगुती सांडपाण्यावर नियंत्रण कधी आणले जाणार? नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित पिण्याचे पाणी कधी उपलब्ध होणार? या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाला द्यावी लागणार आहेत. कुंडलिका नदीचे आरोग्य सुधारून रोहेकरांची तहान भागवण्यासाठी संबंधित यंत्रणा प्रत्यक्ष कृती कधी करणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
नियमित गुणवत्ता तपासणी आवश्यक
नदीचे पाणी पिण्यासाठी वापरण्यायोग्य बनवायचे असल्यास केवळ पाणी उपलब्ध असणे पुरेसे नाही. त्यासाठी प्रदूषणावर नियंत्रण, योग्य जलशुद्धीकरण, नियमित गुणवत्ता तपासणी आणि शास्त्रीय पद्धतीने जलव्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, नदीचे अस्तित्व असूनही नागरिकांची पाण्याची समस्या कायम राहण्याची शक्यता आहे.







