| आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड-राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील जंजिरा किल्ला पाहण्यासाठी राजपुरी बंदर, खोरा बंदर व दिघी जेट्टीवरून दर वर्षी लाखो पर्यटक ये-जा करित असतात. येणार्या पर्यटकांच्या गाडी करिता पार्किंगची सोय उपलब्ध होण्याकरिता मेरीटाइमबोर्डामार्फत करोडो रुपये खर्चून अधिकृत पार्किंग बनविण्यात आले. त्यामधील राजपुरी व दिघी येथील पार्कींग पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. परंतू खोरा बंदर जवळील पार्किंग सुरू करण्यात आल्या नसल्याने या ठिकाणी येणारे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुरुडकडून येणार्या पर्यटकांना किल्ला पाहण्यासाठी खोरा बंदर जवळ पडत असल्याने या ठिकाणी पर्यटकांची गर्दी दिवसांन दिवस वाढत आहे. परंतु या ठिकाणी गाडी पार्किंगसाठी सोय असून सुद्धा पार्किंग सुरू होत नसल्याने पर्यटकांचे याठिकाणी खूप हाल होत आहे. रविवारी खोराबंदरात रस्त्याच्या दोंन्ही बाजूस पार्किंग केल्याने पर्यटकांना गाड्या काढताना अनेक भांडण होतं आहेत. जागा उपलब्ध असून सुद्धा पार्किंग सुरू का होत नाही हा मोठा प्रश्न पर्यटकांना व स्थानिक नागरिकांनाही पडला आहे.
पर्यटकांची मागणी आहे कि, शासकीय अडचणी बाजूला ठेऊन दिवाळी हंगामाकरिता तात्पुरते पार्किंग खुले करावे जेणेकरून आमच्या गाड्या सुरक्षीत राहतील. चुकीच्या पार्किंगमुळे वाद होऊन भांडणे झाली. हे टाळण्यासाठी संबंधित अधिकार्यांनी खोरा बंदराला भेट देऊन पाहणी करून पार्कींग खुले करावे अशी मागणी पर्यटक व स्थानिक मंडळी करत आहे.