पादचारी पुलावरील पत्रे काढण्याची मागणी

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत रेल्वे स्थानकातील पुणे दिशेकडे असलेला पादचारी पूल प्रवासी वर्गासाठी त्रासदायक ठरत आहे. या पादचारी पुलावर दोन्ही बाजूला लावण्यात आलेल्या लोखंडी पत्र्यामुळे हवा येण्या-जाण्यासाठी कोणताही मार्ग राहिला नाही. त्यामुळे या पुलावरून ये-जा करताना प्रवाशांना गुदमरून जाण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे हे पत्रे काढून टाकण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

मध्य रेल्वेवरील मुंबई-पुणे मार्गावरील कर्जत स्थानकात पुणे दिशेकडे एक पादचारी पूल आहे. या पादचारी पुलाच्या फुटपाथवर पावसाचे पाणी येते, त्यामुळे मध्य रेल्वे कडून या पुलाला लोखंडी पत्रे लावण्यात आले आहेत. त्याआधी या पुलाच्या फुटपाथवर दोन्ही बाजूला लोखंडी जाळी होती. परंतु, पावसाळ्यात पडणारे पाणी वाऱ्यासोबत त्या पुलाच्या फुटपाथवर पडून चालणाऱ्या प्रवाशांना त्रासदायक ठरत होते. मात्र, पावसाळा संपल्यानंतरही हे पत्रे काढण्यात न आल्याने या पुलावरून ये-जा करणे प्रवाशांसाठी धोकादायक बनले आहे. लोखंडी पत्र्यामुळे या पादचारी पुलावरून प्रवास करताना कोणत्याही प्रकारची हवा येण्या-जाण्याची व्यवस्था नाही. परिणामी, काही प्रवाशांना या पुलावरून जाताना भोवळ आली आहे. त्याचवेळी येथे मध्य रेल्वेकडून पंखे देखील लावले नाहीत. त्यामुळे प्रवासी स्वतःच्या हाताने वारा घालून तेथून प्रवास करताना दिसत आहेत. त्यामुळे हे लोखंडी पत्रे पावसाळा संपल्यानंतर काढण्यात यावीत आणि हवा येण्याचे मार्ग खुले ठेवावे, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.

Exit mobile version