| आगरदांडा | प्रतिनिधी |
गौरी-गणपतीसह आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर मुरुड आगारातून पूर्वी सुरू असलेल्या एसटी बस फेऱ्या तातडीने पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पेण विभागाचे विभाग नियंत्रक, मुरुड तहसीलदार, मुरुड आगार व्यवस्थापक तसेच मुरुडचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे.
मुरुड शहर व आजूबाजूच्या गावांतील नागरिकांना एसटी शिवाय अन्य प्रभावी सार्वजनिक वाहतूक पर्याय उपलब्ध नसल्याने येथील प्रवासी मोठ्या प्रमाणावर एसटीवर अवलंबून आहेत. मात्र, मुरुड आगारातून पूर्वी सुरू असलेल्या अनेक बसफेऱ्या बंद करण्यात आल्याने नागरिक व प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मुरुड-बोरिवली सकाळी 11.00 वाजताची बस, मुरुड-मुंबई सकाळी 6.30 वाजता, दुपारी 1.00 वाजता आणि सायंकाळी 5.30 वाजताची बससेवा, तसेच मुरुड-स्वारगेटच्या 14 व 15 क्रमांकाच्या फेऱ्या पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मुरुड-बोरिवली, बोरिवली-मुरुड, मुरुड-नालासोपारा आणि नालासोपारा-मुरुड रातराणी बससेवा आवश्यकतेनुसार सुरू करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, प्रवाशांची मागणी नसलेल्या आणि अपेक्षित उत्पन्न मिळत नसलेल्या लांब पल्ल्याच्या बस फेऱ्यांचा आढावा घेऊन त्याऐवजी प्रवाशांची प्रत्यक्ष मागणी असलेल्या मार्गांवर बससेवा सुरू करावी, असे पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाच्यावतीने सुचविले आहे.
एसटी सुरू करण्याची मागणी
