अबालवृद्धांची वानवा; वेळेसह आर्थिक भुर्दंड
| उरण | प्रतिनिधी |
उरण शहरातील पोस्ट ऑफिस हे जेएनपीए वसाहतीमध्ये हलविण्यात आल्याने उरण शहरासह मोरा, नागाव, म्हातवली, केगाव, कोटनाका, काळाधोंडा, मुळेखंड व चाणजे परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यात पोस्ट ऑफिसमध्ये ये-जा करणाऱ्या नागरिकांना वेळेसह आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. तरी लोकप्रतिनिधींनी पोस्ट ऑफिस पुन्हा उरण शहरात आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पोस्ट ऑफिस हे केवळ पत्रे पाठवण्याचे साधन राहिले नसून, ते ग्रामीण व दुर्गम भागात सरकारी सेवा पुरवणारे, 100 टक्के सुरक्षित बचत व गुंतवणूक योजना देणारे आणि आर्थिक साक्षरतेचे प्रमुख केंद्र बनले आहे. हे कमी गुंतवणुकीत अधिक परतावा, जीवन विमा आणि टपाल सेवांच्या माध्यमातून लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. परंतु, उरण शहरासह परिसरातील नागरिकांना शहरातील पोस्ट ऑफिस इतरत्र हलविल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. उरणमधील पोस्ट ऑफीसची इमारत धोकादायक झाल्यामुळे ते वर्षभरापूर्वी जेएनपीए बंदर वसाहतीमध्ये हलविण्यात आले होते. हे ठिकाण उरण शहरापासून साधारण 4 ते 5 कि.मी. अंतरावर आहे. त्यामुळे उरण शहर, मोरा, नागाव, म्हातवली, केगाव, कोटनाका, काळाधोंडा, मुळेखंड व चाणजे परिसरातील अबालवृद्ध नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यात पोस्ट ऑफिसमध्ये ये-जा करणाऱ्या नागरिकांचा वेळ व पैसा वाया जात असून शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. तरी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश बालदी, रायगड जिल्हा परिषद सदस्य, उरण पंचायत समितीचे सभापती, सदस्य व नगराध्यक्षा यांनी जेएनपीए बंदर वसाहतीमध्ये हलविण्यात आलेले पोस्ट ऑफिस पुन्हा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
उरण शहरातील पोस्ट ऑफिस हे जेएनपीए वसाहतीमध्ये हलविण्यात आल्याने नाहक आम्हा नागरिकांना उन्ह, पाऊस सहन करत तसेच आर्थिक भुर्दंड सोसत जेएनपीए वसाहतीमध्ये जावे लागत आहे. तरी लोकप्रतिनिधींनी उरण शहरातील पोस्ट ऑफिस पुन्हा एकदा उरण शहरात आणण्यासाठी पुढाकार घ्यावा.
– पुष्पलता पाटील, जेष्ठ महिला
