| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात यावर्षी 60 आदिवासी वाड्या आणि 18 गावे पाणीटंचाई ग्रस्त आहेत. त्या सर्व ठिकाणी पिण्याचे पाणी टँकरचे माध्यमातून पुरविण्यासाठी पाणीटंचाई कृती आरखडा तयार करण्यात आला आहे. मात्र, पाणीटंचाई वाढल्याने यावर्षी दोन एप्रिल रोजी पहिला पाणी टँकर शासनाचे वतीने सुरु करण्यात आला. गतवर्षी 17 एप्रिल रोजी शासनाचा पहिला टँकर सुरु करण्यात आला होता. दरम्यान, आता आणखी चार गावे वाड्यामध्ये टँकर सुरु करण्याची मागणी कर्जत पंचायत समितीकडे आली आहे.
तालुक्यातील 55 ग्रामपंचायतीमधील पिण्याच्या पाण्याची उन्हाळ्यातील स्थिती लक्षात घेऊन जानेवारी 2024 मध्ये कर्जत पाणीटंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात आला. त्यावेळी आमदार, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा अभियंता यांच्या उपस्थितीत चर्चा करून तालुक्यातील 18 गावे आणि 60 आदिवासी वाड्यांचा समावेश पाणीटंचाई कृती आराखड्यात करण्यात आला. सर्व ठिकाणी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी 51 लाखाची तरतूद करण्यात आली. मात्र, यावर्षी होळीनंतर उष्म्यात वाढ झाली, आणि शेवटी मागणीनुसार तालुक्यात शासनाचा पहिला टँकर सुरु करण्यात आला.
उमरोली ग्रामपंचायतीमधील आषाणे गावात 2 एप्रिल रोजी पहिला टँकर सुरु झाला. शासनाचा पहिला टँकर सुरु झाल्यानंतर आता तालुक्याच्या अन्य भागातून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाथरज ग्रामपंचायतीमधील मेचकरवाडी, पिंगळस, जांभुळ्वाडी आणि धामणी या चार ठिकाणी शासनाचे पाणी टँकर सुरु करण्याचे प्रस्ताव ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहेत. सर्व प्रस्ताव नुसार पंचायत समितीकडून पडताळले जाणार आहेत. त्या सर्व वाड्या आणि गावांमध्ये भूजल सर्वेक्षण टीम तेथे जाऊन पाहणी करणार आहे. त्यांनुसार टँकर सुरु करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
सध्या एक टँकर आला आहे, पण आणखी टँकर येणार असून या सर्व टँकरमध्ये जिपीआरएस प्रणाली लागू केली आहे. त्यामुळे टँकर ठरवून दिलेल्या गावे, वाड्या येथे वेळेवर पोहचतो की नाही हे पाहता येणार आहे.
गोवर्धन नखाते,
कर्जत पंचायत समिती