सखोल चौकशी करून कारवाईची मागणी

| उरण | प्रतिनिधी |

उरण येथील द्रोणागिरी नोड येथे शनिवारी (दि. 24) रात्री भीषण अपघातीची घटना घडली होती. या अपघाताची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी उरण सामाजिक संस्थेतर्फे न्हावा शेवा बंदरचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल नेहूल, उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे करण्यात आली आहे.

द्रोणागिरी नोड येथील देवकृपा चौकमध्ये शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास एका वाहनाने भीषण अपघात केल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले होते. याआधी चार-पाच महिन्यांपूर्वी उरण मध्येच एका बेधुंद वाहनचालकाच्या अक्षम्य चुकीमुळे पती-पत्नी जोडप्याला प्राण गमवावे लागले होते. तर, त्यांची 3-4 वर्षांची मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे. बेदरकार चालकांमुळे निरापराध्यांचे जीव जाणे ही कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. या पार्श्वभूमीवर, जागरुक नागरिक म्हणून नागरिकांनी तसेच उरण उरण सामाजिक संस्थेने पोलीस प्रशासनाकडून दोषीवर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

या सर्व घडामोडींनंतर उरण सामाजिक संस्थेने विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. अपघात झालेल्या वाहनाचा शोध लागल्यामुळे वाहन चालकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करून त्याच्यावर त्वरीत कायदेशीर कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच, वाहनचालक एक महिला असल्याची चर्चा जनतेमध्ये आहे. यावेळी वाहनचालक गाडी सोडून पळाला असल्यामुळे हे प्रकरण ‌‘हिट अँड रन’ गुन्ह्याखाली मोडते किंवा कसे ते तपासण्यात यावे. तसेच, उरणमधील वाहनचालकांना शिस्त लागावी, बेकायदेशीर चालकांना शासन होईल आणि निरापराध नागरिक सुरक्षित राहतील याबाबत आपण कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुधाकर पाटील, संतोष पवार, सीमा घरत, काशिनाथ मायकवाड, कॉ. भूषण पाटील यांनी उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ, न्हावा शेवा बंदरचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल नेहूल यांच्याकडे केली आहे.

Exit mobile version