शिधा पत्रिकेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शिधापत्रिका मिळविण्यासाठी अलिबाग तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेकडे मागणी केली होती. त्यानंतरही अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले, असा आरोप वयोवृद्ध नागरिक किसन खोडे यांनी केला आहे. तसेच त्यांनी गुरुवारी आंदोलन केले. खाडे हे अपंग वयोवृद्ध आहेत. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारी नियमांप्रमाणे तात्पुरत्या स्वरूपात रेशन कार्ड मिळावे यासाठी अलिबाग तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेत अर्ज केला; परंतु तेथील अधिकार्‍यांनी रेशन कार्ड देण्यास नकार दिला असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

मी अपंग आणि वयोवृद्ध आहे. सध्या अलिबाग स्थानकाच्या परिसरात राहतो. निवार्‍यासह उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने परिस्थिती बिकट आहे. शासन निर्णयाप्रमाणे रेशन कार्ड मिळविण्यासाठी पुरवठा शाखेत अर्ज केला; परंतु त्यांच्याकडून देण्यात आला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. – किसन खोडे, आंदोलनकर्ते.

आंदोलनकर्ते किसन खोडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले होते. त्यांच्याशी सकारात्मक चर्चा करून त्यांचा प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना शिधापत्रिका देण्याबाबत अलिबागमधील पुरवठा निरीक्षकांना सूचना करण्यात आल्या आहेत. – मधुकर बोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड.

Exit mobile version