कृषी सहाय्यकांकडून ‘चारसूत्री’चे प्रात्यक्षिक

। तळा । वार्ताहर ।
तळा तालुक्यातील काकडशेत येथील प्रगत शेतकरी चंद्रकांत राऊत यांच्या शेतात चारसूत्री लागवड करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी कृषी सहाय्यक योगेश कोळी, पी.जी. पुरी यांनी स्वत: शेतात उतरुन शेतकरी व शेतमजूर यांच्यासोबत भातलागवड केली.

चारसूत्री भातलागवड केल्यास शेतात भात उत्पादन वाढणार यात शंका नाही. अशा लागवडीमुळे दोन्ही रोपांतील अतंर समांतर राहिल्याने हवा खेळती राहून सूर्यप्रकाश सगळ्या रोपांना मिळतो, त्यामुळे रोपांची वाढ झपाट्याने होते. रोपे दोन ते तीन काड्या लावल्याने त्यांना फुटवे चांगले जोरदारपणे फुटतात. दोन्ही रोपांतील अंतरावर युरीया ब्रॅकेटची गोळी दिल्याने रोपांची चांगली झपाट्याने वाढ होते. अशा पद्धतीने लागवड केली तर रोपे कमी लागतात. त्यामुळे मजुरांची संख्या कमी लागल्याने मजुरीवरील खर्च कमी होतो. अशा पद्धतीने शेतकर्‍यांनी लागवड करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

चारसूत्री पद्धतीने लागवड केल्यास पिके जोमदार येतील. खर्चसुद्धा कमी होईल. पीक मात्र दुप्पट मिळेल. कृषी विभाग आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे.

– योगेश कोळी, कृषी सहाय्यक



Exit mobile version