महापुरानंतर आता डेंग्युचे संकट

खेडमध्ये रुग्ण वाढू लागले, गाळ, चिखलामुळे डासांची उत्पत्ती
| खेड । अजित जाधव ।
महापुराचा आस्मानी संकटातून हळुहळु सावरण्याचा प्रयता करत असणार्‍या खेडवासियांना आता डेंग्युचा सामना करावा लागतो आहे. महापुरामुळे शहरात साचून राहिलेले पाणी, गाळ,चिखल यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली असून खेड शहर आणि आजुबाजुच्या परिसरात डेंग्युची साथ झपाट्याने पसरू लागली
आहे.

जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खेड शहरालगत वाहणार्‍या जगबुडी आणि नारिंगी या दोन्ही नद्यांना महापुर आला. पुराचे पाणी खेडच्या बाजारपेठेत आणि आजुबाजुच्या गावांमध्ये घुसल्याने हाहाकार उडाला. तीन दिवसांनंतर महापुर ओसरला मात्र पुर ओसरल्यावर पुरग्रस्त भागात चिखल, गाळ आणि पाण्याची डबकी तयार झाली.महापुरात दुकानात पाणी शिरल्याने दुकानातील अन्नधान्य व इतर सामान कुजुन गेले. त्यामुळे साफसफाईला सुरवात झाल्यावर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली. शहरात सगळीकडे पसरलेला झालेला चिखल, निर्माण झालेली डबकी यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली.
महापुरानंतर येणारी संभाव्य रोगराईटाळण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने तात्काळ साफसफाईचे काम हाती घेतले. रोगराई पसरू नये यासाठी निर्मुलन मोहीम हाती घेण्याबरोबरच आरोग्य शिबीराचेही आयोजन केले मात्र तरीही डेंग्यूने शहर व पसिरात मोठ्या प्रमाणात हातपाय पसरायला सुरवात केली आहे.गेले दीड वर्षे कोरोनाच्या महामारीचा सामना करता करता नागरिकांच्या नाकी दम आला आहे. कोरोना ने कित्येक संसार उद्धवस्त झाले आहे. अनेकांच्या घरातील कर्ता पुरुष कोरोनाचा बळी ठरला आहे तर कित्येकांच्या नोकर्‍या गेल्या असल्याने घरावर आर्थिक संकट कोसळलं आहे. या परिस्थिचा कसातरी सामना करत असलेल्या खेडवासियांना आता महापुराने पुरते उद्धवस्त केले आहे.

महापुरामुळे झालेल्या नुकसानीतून पुन्हा उभे राहण्यासाठी निकराचा प्रयत्न करत असलेल्या खेडवासियांना आता डेंग्युसारख्या महाभयंकर रोगराईचा सामना करावा लागतो आहे. गेल्या चार दिवसात शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात डेंग्युसदृश्य रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णालयात येणार्‍या दहा रुग्णांपैकी दोन रुग्ण कोविडचे तर 8 रुग्ण डेंग्यूचे असल्याचे निष्पण्ण होत असल्याने झपाट्याने पसरणार्‍या डेग्युला आळा घालावा कसा हा प्रश्‍न आरोग्य यंत्रणेला पडला आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या खेड तालुक्यात 174 कोवीडचे रुग्ण तर डेंग्युसदृश्य 22 रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्युची साथ रोखण्यासाठी आरोग्य विभागाने किटकनाशक फवारणी करण्यास सुरवात केली असून नागरिकांना डेंग्युपासून बचाव करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत जनजागृती केली जात आहे.

Exit mobile version