Uran Dengue Outbreak: उरणमध्ये डेंग्यूचा कहर

82 डेंग्यू सदृश्य रुग्णांची तपासणी; 27 रूग्णांना डेंग्यूची लागण

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण तालुक्यात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच डेंग्यूने धोक्याची घंटा वाजवली आहे. 18 जुलैपर्यंत 82 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 27 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. न्हावा, करंजा, डाऊरनगर, कोप्रोली, पाणदिवे आणि उरण शहर हे परिसर डेंग्यूचे हॉटस्पॉट बनत असल्याने आरोग्य विभागाने औषध व धूर फवारणीसह प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. बदलते हवामान आणि साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत असून, पुढील काही दिवसांत रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

डासांचा वाढता प्रादुर्भाव आणि बदलते हवामान यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत चिंता व्यक्त होत आहे. इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात 18 जुलैपर्यंत डेंग्यूसदृश्य 82 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 17 जणांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाबासो कालेल यांनी दिली. तर कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात 11 डेंग्यू रुग्णांची नोंद झाल्याची माहिती उरण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वंदनकुमार पाटील यांनी दिली. त्यामुळे दोन्ही आरोग्य संस्थांमधील एकूण रुग्णसंख्या 27 वर पोहोचली आहे. यापूर्वी मे महिन्यात इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात 95 संशयितांची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये 19 रुग्णांना डेंग्यूची लागण झाली होती. तर जून महिन्यात 133 संशयितांपैकी 30 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.

न्हावा, करंजा, डाऊरनगर, कोप्रोली, पाणदिवे, उरण शहर तसेच ग्रामीण भागात डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळत असल्याने हे परिसर सध्या डेंग्यू हॉटस्पॉट म्हणून ओळखले जात आहेत. याशिवाय काही ठिकाणी मलेरियाचे रुग्णही आढळत असल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून औषध फवारणी, धूर फवारणी आणि जनजागृती मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

Exit mobile version