उरणमध्ये डेंग्यूचा शिरकाव

| उरण | प्रतिनिधी |

उरण शहरात डेंग्यूची साथ हळूहळू डोकेवर काढत आहे. त्यामुळे उरणमधील बिघडलेल्या स्वच्छता व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. उरण शहर आणि परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. अनेक भागांतील नाले तुंबलेले आहेत, सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे, तर ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचलेले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच शहरातील परिस्थिती गंभीर बनली असून, डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथीच्या आजारांचा धोका वाढू लागला आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा लेखी आणि तोंडी स्वरूपात नगरपरिषद प्रशासनाला स्वच्छता, नालेसफाई आणि डास प्रतिबंधक फवारणीबाबत तक्रारी करण्यात आल्या. मात्र, त्याची अपेक्षित दखल घेतली गेली नाही. आरोग्य विभागाकडून वेळेवर उपाययोजना न झाल्याने आज परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

उरणमधील अनेक भागांत नाली बांधकामे रखडलेली आहेत. रस्त्यांची दुरवस्था, साचणारे पाणी आणि अपुऱ्या स्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच नगरपरिषदेला नियमित मुख्याधिकारी नसल्याने अनेक महत्त्वाचे निर्णय आणि कामे रखडल्याचेही बोलले जात आहे. याचा थेट परिणाम शहराच्या आरोग्य आणि स्वच्छता व्यवस्थेवर होत असल्याचा आरोप होत आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी डासांची उत्पत्ती थांबविणे, साचलेले पाणी हटविणे, नियमित फवारणी करणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणे अत्यावश्यक आहे. मात्र, प्रशासनाची उदासीनता कायम राहिल्यास आगामी पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. पावसाळ्याच्या तोंडावर निर्माण झालेली ही परिस्थिती धोक्याची घंटा मानली जात असून, वेळेत ठोस उपाययोजना न झाल्यास उरण शहराला मोठ्या आरोग्य संकटाला सामोरे जावे लागू शकते, अशी भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.

Exit mobile version