| पनवेल | वार्ताहर |
खारघर वसाहतीत डास, मच्छर यांचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्दी, ताप, खोकला, हिवताप, डेंग्यू आणि स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे चित्र दिसत असून, खारघरमधील नागरी आरोग्य केंद्र आणि खासगी रुग्णालये रुग्णांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. डेंग्यू, स्वाइन फ्ल्यू आजारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
खारघर वसाहतीत आजही काही भागात मलनिस्सारण वाहिन्या भरल्याने रस्त्यावरुन दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याचे चित्र दिसत आहे. सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे डासांची उत्पत्ती वाढल्याने जुलै महिन्यात खारघरमध्ये डेंग्यूचे 11, तर हिवतापाचे 25 रुग्ण आढळून आले होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्यामुळे सर्दी, ताप, खोकला, हिवताप, डेंग्यू आणि स्वाइन फ्ल्यू आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेचे नागरी आरोग्य केंद्र तसेच खारघरमधील खासगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी दिसून येते. खारघर परिसरात काही दिवसांपासून हिवताप, सर्दी, खोकला, ताप, घसादुखी, अशक्तपणा या आजारांमुळे नागरिक बेजार झाले असून, त्यात डेंग्यू आणि स्वाइन फ्ल्यू आजाराच्या रुग्णसंख्येत भर पडू लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, असे खासगी रुग्णालयात विचारणा केली असता सांगण्यात आले. दरम्यान, उपचार घेणार्या नागरिकांनी पावसाचे दिवस असल्याने पाणी उकळून प्यावे, तसेच बाहेरील खाद्य पदार्थ खाणे टाळावे, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.