| सोलापूर | वृत्तसंस्था |
माढा लोकसभा मतदारसंघातून सत्ताधारी भाजपने ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते-पाटील यांना उमेदवारी नाकारून विद्यमान खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पुनःश्च संधी दिल्यामुळे मोहिते-पाटील कुटुंबीयांची नाराजी कायम आहे. यातून माढ्यातील राजकीय घडामोडींकडे सर्वांच्या नजरा वळल्या आहेत. परंतु मोहिते-पाटील यांना एखाद्या निवडणुकीत उमेदवारी नाकारण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. अशा प्रसंगातून सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनाही जावे लागले होते. 1972 सालच्या गाजलेल्या अकलूजच्या लक्षभोजन प्रकरणामुळे सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचे त्यावेळी विधानसभेचे तिकीट कापण्यात आले होते.
सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनाही पुढे 1978 सालच्या विधानसभा निवडणुकीत जनता लाटेत पाणीवचे शामराव पाटील यांच्याकडून पराभूत व्हावे लागले होते. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र विजयसिंह मोहिते-पाटील यांनी घराण्याचा वारसा पुढे नेताना पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा निर्माण केला. उपमंत्रीपासून ये उपमुख्यमंत्रिपदापर्यंत वाटचाल करताना त्यांनी सुवर्णकाळ अनुभवला. परंतु 2009 नंतर त्यांची राजकीय पीछेहाट होत गेली. पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची साथ सोडून त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करणे पसंत केले. मात्र, यंदा माढा लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचे पुतणे धैर्यशील यांना भाजपने तिकीट नाकारून त्यांचा हिरमोड केला आहे.
1972 साली लक्षभोजन प्रकरणामुळे शंकरराव मोहिते-पाटील यांचे आमदारकीचे तिकीट कापण्यात आले असता त्यांनी आपल्या एका सहकार्याला विधानसभेवर बिनविरोध निवडून आणण्याची किमया सहजपणे केली होती. परंतु, बदलत्या राजकीय वातावरणात याच मोहिते-पाटील कुटुंबीयांतील धैर्यशील यांना भाजपने माढा लोखसभेचे तिकीट नाकारल्यानंतर मोठाच संघर्ष करावा लागत आहे.