दहा तालुक्यांमध्ये पाण्याचा दुष्काळ; 319 ठिकाणी 47 टँकरने पाणीपुरवठा
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाण्याची पातळी कमी झाली असून, अनेक धरणांनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाण्याची समस्या भीषण होऊ लागली आहे. पाण्यासाठी नागरिकांना विशेष करून महिलांना दीड ते दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहेे. रायगड जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये पाण्याचा दुष्काळ निर्माण झाला असून, 84 हजार 792 नागरिकांना पाणीटंचाईने ग्रासले आहे. उन्हाच्या चटक्याबरोबरच नागरिकांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. दरम्यान, टंचाईग्रस्त गावातील नागरिकांची पाण्यासाठी हेळसांड होऊ नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने 319 ठिकाणी 47 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
रायगड जिल्ह्यातील पाणीपुरवठा करणार्या प्रकल्पात पाहिजे त्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध नाही. त्यातच या प्रकल्पातील सिंचनासाठी होणारा भरमसाठ वापर, उष्णतेमुळे होणरे पाण्याचे बाष्पीभवन, पाण्याच्या चोरीमुळे धरणांमधील पाण्याने तळ गाठला आहे. दिवसागणिक धरणांतील जलसाठा कमी होत असल्यामुळे पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. अनेक गावांतील पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे हंडाभर पाण्यासाठी महिलांना कोसोदूर पायपीट करावी लागत आहे. अनेक गावांत तर पाण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागत आहे. ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे, तेथे पाणी भरण्यासाठी महिलांच्या रांगा लागत आहेत. जेथे ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही, तेथे जनावरांना पिण्यासाठी पाणी कोठून आणावे, असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील 56 गावे, 263 वाड्या अशा एकूण 319 ठिकाणी पाण्याचा दुष्काळ सुरू झाला आहे. नागरिकांची पाण्यासाठी हेळसांड होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने अलिबाग तालुक्यात तीन गावांसाठी दोन टँकर, पेणमध्ये तीन गावे, 68 वाड्यांमध्ये 10, पनवेमध्ये आठ गावे, 16 वाड्यांमध्ये नऊ टँकर, उरणमध्ये चार वाड्यांमध्ये एक, कर्जतमध्ये अकरा गावे, 19 वाड्यांमध्ये पाच, खालापूरमध्ये सहा गावे, 12 वाड्यांमध्ये पाच, महाडमध्ये 17 गावे, 126 वाड्यांमध्ये नऊ, पोलादपूरमध्ये सात गावे, 13 वाडयांमध्ये तीन, श्रीवर्धनमध्ये दोन वाड्यांमध्ये एक टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु केला आहे. या टँकरवरच टंचाईग्रस्त गावांची मदार अवलंबून आहे. अजून पावसाला सुरुवात झालेली नाही, त्यामुळे टँकरग्रस्त गावांमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, हवामान खात्याने येत्या दोन ते तीन दिवसात पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरणही ठिकठिकाणी आहे. त्यामुळे सर्वांचे डोळे आभाळाकडे लागून राहिले आहेत.
जिल्ह्यात यलो अलर्टचा इशारा रायगड जिल्ह्यासह रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. आठ जून पर्यत जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी, तर काही ठिकाणी विजांच्या गडगडाटांसह पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी या कालावधीत काळजी घ्यावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थाप अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
पिण्यासाठी विकतचे पाणी रायगड जिल्ह्यामध्ये मार्चपासूनच पाण्याची समस्या सुरू झाली आहे. आठ-आठ दिवस पाणी मिळत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागत आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वीस लीटर पाणी 50 ते 60 रुपयांनी विकले जात आहे. त्यामुळे पिण्यासाठी काहीजण विकतचे पाणी घेत आहेत. काही ठिकाणी जलशुध्दीकरण केंद्र उभारल्याने महिन्याला दोनशे तीनशे रुपये भरून त्या केंद्राद्वारे पाणी घेत आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
पाणी भरण्यासाठी झुंबड गावात पाण्याचे टँकर येताच पाणी भरण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडत आहे. कधी कधी पाणी भरण्यावरुन वादही होत आहेत. ज्या गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, त्यांना दिलासा मिळत असला तरी पाऊस वेळेवर पडला नाही तर आगामी काळात जिल्हह्यातील आणखी बर्याच गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे.
