106 योजनापैंकी 6 योजना पूर्ण
| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यात पाण्याचे स्त्रोत मुबलक असूनदेखील फेब्रुवारीपासूनच ग्रामीण भागात पाणीटंचाईची बोंबाबोंब सुरु होते. 2021 पासून आत्तापर्यंत एकूण 106 योजना मंजूर असून, त्यासाठी 11,518.17 लक्ष रुपये मंजूर आहेत. त्यापैकी फक्त 6 योजना पूर्ण झाल्या आहेत. त्यामध्ये हेटवणे, सावरसई, नाडा, नानेगाव, रेवोळी आणि तिलोरे यांचा समावेश आहे. उरलेल्या 100 योजना अपुऱ्या स्थितीत आहेत.
जलजीवन मिशन योजनेंतर्गत ‘हर घर पाणी’ म्हणजेच शेवटच्या माणसापर्यंत पाणी पोहोचवणे हे उद्दिष्ट आहे. परंतु, कामचुकार अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि ठेकेदारांचा गलथान कारभार यामुळे 100 योजनांची कामे आजही रखडलेली आहेत. या योजना पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांपासून दीड वर्षापर्यंत मुदत आहे. काहींच्या मुदतीदेखील संपल्या आहेत, तरीदेखील योजना पूर्ण झालेल्या नाहीत, हीच मोठी शोकांतिका आहे.
106 योजनांसाठी 11,518.17 लक्ष रुपये मंजूर असून, त्यापैकी 2,927.56 लक्ष रुपये आत्तापर्यंत खर्च झाले आहेत. म्हणजेच, मंजूर असलेल्या योजनांपैकी 24.42 टक्के रुपयांचा खर्च झाला आहे. तर 8,590.61 लक्ष रुपये एवढी रक्कम खर्च झालेली नाही. ज्या योजना पूर्ण झाल्या आहेत, त्यामध्ये शाखा अभियंता एस.एस. देशमुख यांच्या देखरेखीखालील कामे मोठ्या प्रमाणात पूर्ण झालेली आहेत. आणि जी कामे अपूर्ण आहेत, त्यामध्ये रमेश राठोड यांना श्रेय द्यावे लागेल. सदरची माहिती घेतल्यानंतर ही बाब समोर आली आहे की, अनेक ठेकेदारांना काम करण्याची ऐपत नसतानाही काम घेतल्याने आजच्या स्थितीला काम अपुरे असल्याचेदेखील स्पष्ट होत आहे. ही कामे पूर्ण न होण्यामागे आणखी एक मोठे कारण म्हणजे, लोकप्रतिनिधींची जलजीवन योजना पूर्ण न होण्यामागील उदासीनता. तसेच यातील जाचक अटी, हेही कारण होऊ शकते.