नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित

सिडकोविरोधात बेमुदत उपोषणाचा इशारा

| उरण | वार्ताहर |

सिडको प्रशासनाने दिघोडे, वेश्‍वी ग्रामपंचायत हद्दीतील नुकसानग्रस्त रहिवाशांना दोन वर्षांचा कालावधी लोटत आल्यानंतरही भरपाईचा मोबदला दिला नाही. सिडकोच्या मनमानी कारभाराविरोधात तसेच नुकसानग्रस्त रहिवाशांना आर्थिक मोबदला मिळावा यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा रायगड जिल्हा परिषदेचे मा. सदस्य डॉ. मनिष पाटील यांनी सिडको कार्यालयासमोर सोमवार, दि. 19 सप्टेंबर रोजी बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

जिल्हाधिकारी रायगड, सिडको,उरण तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात डॉ. मनिष पाटील नमूद केले आहे की, 17 डिसेंबर 2020 रोजी नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी दीड मीटर व्यासाची जलवाहिनी दिघोडे ग्रामपंचायत हद्दीत फुटली होती. या फुटलेल्या जलवाहिनीमधील पाण्याच्या प्रवाहाने परिसरातील रहिवाशांच्या राहत्या घराचे व व्यावसायिकांच्या दुकानातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच रस्त्यावरील वाहने वाहून गेल्याची घटना घडली होती.

या अपघातात रहिवासी, प्रवासी नागरिक थोडक्यात बचावले होते. या घटनेचे गांभीर्य ओळखून नुकसानग्रस्त रहिवाशांच्या घरांचे, व्यावसायिकांच्या दुकानाचे पंचनामे हे महसूल विभागाचे अधिकारी आणि दिघोडे ग्रामपंचायतीने तातडीने केले होते. आणि तशा प्रकारचा अहवाल सिडकोकडे सादरही करण्यात आला. यावेळी सिडकोकडून नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देण्याचे आश्‍वासन दिले. परंतु, नुकसानग्रस्त रहिवाशांकडून सातत्याने पाठपुरावा करूनही आजतागायत सिडकोकडून रहिवाशांना आर्थिक मदत देण्यात आली नाही. सिडकोच्या विरोधात तसेच नुकसानग्रस्त रहिवाशांना सिडकोकडून आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी सिडको कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा डॉ. मनिष पाटील यांनी दिला आहे.

Exit mobile version