| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग – रोहा मार्गावर सुरू असलेल्या रस्ते, गटारे आणि क्रॉसड्रेनच्या कामांमुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असून, याचा थेट फटका शालेय विद्यार्थ्यांना बसला. सोमवारी झालेल्या वाहतूक कोंडीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेला पोहोचणे कठीण झाले होते. त्यामुळे संतापलेल्या पालकांसह नागरिकांच्या संतापाचा आक्रोश झाला. दिवसभर नागरिकांनी प्रशासन तसेच ठेकेदाराला फैलावर घेतले होते. त्यातच चिंतामणराव केळकर विद्यालयाचे अध्यक्ष अमर वार्डे यांनी प्रशासनाला निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर 2 हजार विद्यार्थ्यांसह आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी तातडीचे आदेश देत परीक्षा कालावधीत दिवसा रस्त्याचे काम बंद करण्याचा निर्णय घेतला.
अलिबाग शहराच्या हद्दीबाहेरील कुरूळ ते सुडकोली, कुरूळ-आक्षी मार्गे रेवदंडा आणि रेवदंडा बायपास रोड या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू आहे. मात्र, या कामांबाबत गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाच्या व्यापात ही समस्या छोटी वाटू शकते, परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्रशासनाने तातडीने कृती न केल्यास नाईलाजास्तव शाळेसमोर रस्त्यावर बैठक मारावी लागेल, असा सज्जड इशारा अमर वार्डे यांनी निवेदनात दिला आहे. प्रशासकीय हालचाली आणि तातडीचा निर्णय या निवेदनाची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते संजय गंगाराम सावंत यांनी निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकारी रायगड संदेश शिर्के यांची भेट घेतली.
प्रशासनाचा निर्णय रात्रीच्या वेळी काम: निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता दिलीप हिंगे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. तसेच या चर्चेत रात्री काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिवसा काम बंद: परीक्षा कालावधी लक्षात घेता, विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी दिवसा रस्त्याचे काम पूर्णपणे थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रशासनावर अंमलबजावणीची जबाबदारी
या प्रकरणानंतर रायगड जिल्हा प्रशासनावर कामांची सातत्याने पाहणी करण्याची जबाबदारी वाढली आहे. स्थानिक नागरिक आणि पालकांनीही प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले असले तरी भविष्यात अशा नियोजनशून्य कामांमुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
