उपसरपंच व सरपंच वाढीव मानधनाविना

सदस्यांचा बैठकभत्ता रखडला
। पोलादपूर । प्रतिनिधी ।

पोलादपूर तालुक्यातील 41 ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचाना वाढीव मानधनाची प्रतिक्षा असून 500 हून अधिक ग्रामपंचायत सदस्यांनाही बैठकभत्ता गेल्या चार वर्षांपासून मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. राज्याच्या अर्थमंत्र्यांनी 2019-20चा अर्थसंकल्प मांडताना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त पंचायतराज संकल्पनेचा पाया असलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांच्या मानधनात लक्षणीय वाढ करण्यासाठी 200 कोटी रूपये राखून ठेवले. 30 जुलै 2019 च्या शासननिर्णयानुसार सरपंचांप्रमाणे उपसरपंचांनाही मानधन अनुज्ञेय केले असून ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या वेतनाप्रमाणे त्यांच्या बँकेच्या खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा करण्याचे निश्‍चित झाले होते. याबाबत प्रत्येक ग्रामसेवकाने सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांची नांवे अद्ययावत करायची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली असून प्रत्येक पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांनी अद्ययावत माहितीच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या कामकाजाच्या दिवशी अथवा दुसर्‍या दिवशी मानधनाची रक्कम जमा झाल्याची खातरजमा करावी. यासोबतच राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान पुणेचे संचालक यांनी या संबंधातील अहवाल दर महिन्याला शासनाला सादर करावयाचा आहे, असे या शासननिर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे.


मात्र, गेल्या चार वर्षांपासून ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच यांचे अनुज्ञेय मानधन तसेच ग्रामपंचायत सदस्यांचा बैठकभत्ता या रक्कमा त्यांच्या बँकेच्या खात्यात वर्ग झाल्या नसून यासंदर्भात प्रत्येक तालुक्याच्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, प्रत्येक जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी तसेच राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान पुणेचे संचालक यांनी या रक्कमा संबंधितांच्या बँक खात्यात थेट जमा होत नसल्याबाबत दरमहिन्याला अहवाल दिला आहे अथवा कसे, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होत नाही. यामुळे केवळ रायगड जिल्हा आणि पोलादपूर तालुक्यातील सरपंच, उपसरपंच हे वाढीव मानधनापासून आणि ग्रामपंचायत सदस्यही बैठकभत्त्यापासून वंचित राहिले नसून संपूर्ण राज्यात अशी परिस्थिती असण्याची शक्यता दिसून येत आहे.

Exit mobile version