| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महापालिका क्षेत्रात भटक्या श्वानांसाठी तब्बल 40 खाद्यठिकाणे ठरविण्यात महापालिकेच्या पशु वैद्यकीय आरोग्य विभागाला यश आले आहे. श्वानप्रेमींच्या मागणीनंतर ही कारवाई करण्यात आली. खाद्यपदार्थामुळे भटके श्वान आणि माणसांमध्ये संघर्ष टाळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांसाठी महापालिका स्तरावर शहरातील निर्जनस्थळी स्वतंत्र खाद्यठिकाणे ठरवून देण्याचे निर्देश होते.
पनवेल महापालिकेमधील भटक्या श्वानांची काळजी करणाऱ्या काही संस्था आणि श्वानप्रेमींनी केलेल्या मागणीनंतर ही ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. पनवेल महापालिकेने भटक्या श्वानांसाठी निश्चित केलेल्या खाद्य ठिकाणांमध्ये 19 ठिकाणे ही खारघर वसाहतीमध्ये असल्याची माहिती पनवेल महापालिकेच्या पशू वैद्यकीय आरोग्य विभागाने दिली. तसेच पनवेल महापालिका क्षेत्रातील इतर श्वानप्रेमीही भटक्या श्वानांसाठी खाद्यपदार्थाची ठिकाणे पशु वैद्यकीय विभागाला सूचवू शकतील. ही ठिकाणी निश्चित करताना दवाखाना, शाळा आणि मंदिर अशा वर्दळीची ठिकाणांपासून हे ठिकाण दूर असावे अशी मुख्य अट आहे.
एआयच्या माध्यमातून सर्वेक्षण
पनवेल महापालिकेने एआयच्या माध्यमातून पालिका क्षेत्रातील भटक्या श्वानांचे सर्वेक्षण केले आहे. यामध्ये श्वानांचे फोटो आणि त्यांची ओळख अशी माहिती एका सॉफ्टवेअरमध्ये संकलित केली आहे. या सर्वेक्षणानुसार पनवेलमध्ये 20 हजार भटके श्वान आणि खासगी 5 हजार श्वान असल्याचे स्पष्ट झाले. अशा पद्धतीने एआयच्या माध्यमातून भटक्या श्वानांचे सर्वेक्षण करणारी पनवेल ही एकमेव महापालिका आहे.





