राष्ट्रवादी युवक काँग्रेसची तातडीच्या कारवाईची मागणी
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
तळोजा गावातील नॅशनल उर्दू शाळा परिसरात सांडपाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून, याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने पनवेल महानगरपालिकेकडे तक्रार करण्यात आली आहे. पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शहाबाज फारूक पटेल यांनी शहर अभियंता यांना लेखी निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शाळा परिसरात गटाराचे सांडपाणी रस्त्यावर व परिसरात साचत असून त्यामुळे तीव्र दुर्गंधी पसरली आहे. या समस्येमुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी तसेच शाळेत येणाऱ्या लहान मुलांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे. संसर्गजन्य आजार पसरू शकण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
याशिवाय, सांडपाण्यामुळे रस्ता घसरडा झाला असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ पाहणी करून सांडपाण्याचा योग्य निचरा करावा, गटार दुरुस्ती व स्वच्छता कामे हाती घ्यावीत तसेच कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जिल्हाध्यक्ष शहाबाज फारूक पटेल यांनी केली आहे.






