। रसायनी । राकेश खराडे ।
रसायनी पोलीस ठाणे हद्दीमधील मौजे आपटा गावाजवळील दांड-आपटा रोडवरील वळणावर एका 19 वर्षीय तरूणाचा टेम्पोने फरफटत नेल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.
रसायनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपटा गावाच्या हद्दीतील वळणावर अजय कातकरी रा. डाऊरनगर, कातकरवाडी-उरण हा व त्याचे नातेवाईक राजेश कातकरी (21) हे दोघे तक्रारदार मित्र राजेश कातकरी याच्या मालकीच्या स्पेंडर मोटारसायकलवरून रसायनी येथे नातेवाईकांच्या हळदी कार्यक्रमाला जात होते. आपटा ते दांडफाटा रोडवर आपटा गावाच्या हद्दीत वळणाच्या रस्त्यावर मोटारसायकल घसरल्याने दोघे रस्त्यावर पडल्याने या अपघातात राजेश कातकरी याला डोक्याला व हातापायाला खरचटले असून, मुका मार लागला त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्या सोबत असलेला नातेवाईक मयत अजय कातकरी रस्त्यावर पडला असताना त्याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका अज्ञात टेम्पोच्या खालील बाजूस अजय कातकरी याचे कपडे अडकल्याने त्यास या टेम्पो चालकाने तसेच फरफटत तीन किलोमीटर नेल्याने अजय कातकरी यास गंभीर स्वरूपाची दुखापत होऊन मयत झाला. आरोपी अज्ञात टेम्पो चालकाचा पोलीस तपास करीत असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार सपोनि प्रमोद जाधव अधिक तपास करीत आहेत.






