बंदी असूनही विठ्ठलवाडीत उघड्यावर चिकन विक्री सुरू
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
विमानतळ परिसरात मांस विक्रीवर स्पष्ट बंदी असतानाही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागूनच असलेल्या जुन्या पनवेल-उरण मार्गावरील विठ्ठलवाडी येथे उघड्यावर चिकन विक्री सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव पाहायला मिळत आहे. रस्त्याच्या कडेला झाडाखाली पिंजऱ्यात कोंबड्या ठेवून सर्रास विक्री होत असल्याचे दिसत आहे.
या ठिकाणी स्वच्छतेचे कोणतेही नियम पाळले जात नसून, उघड्यावरच कोंबड्यांची विक्री केली जात आहे. अशा प्रकारच्या मांस विक्रीमुळे पक्षी आकर्षित होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे विमान सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे.विमानतळापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या उलवे येथील चिकन-मटण विक्री करणाऱ्या दुकानांविरोधात नॅट कनेक्ट फाऊंडेशनतर्फे नागरी विमान वाहतूक महासंचालकांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. संस्थेचे संचालक बी.एन. कुमार यांनी केलेल्या तक्रारीनुसार संबंधितांना कारवाईच्या सूचना त्यावेळी देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरदेखील विठ्ठल वाडी परिसरात सुरु असलेल्या चिकन विक्रीमुळे विमानतळ परिसरात चिकन, मटण विक्रीसाठी असलेली बंदी केवळ कागदावरच आहे का, असा सवाल उपस्थित होत असून, प्रशासनाकडून कारवाई का होत नाही, असा थेट प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
कच्च्या मांसाचा कचरा जो योग्यरित्या विल्हेवाट लावला जात नाही, तो अनेक पक्ष्यांना उड्डाण क्षेत्राजवळ खाण्यासाठी आकर्षित करतो आणि नवी मुंबई विमानतळावरील विमानांना गंभीर धोका निर्माण करू शकतो.
काय आहेत नियम?
नागरी उड्डाण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, विमानतळाच्या दहा किलोमीटर परिसरात पक्ष्यांना आकर्षित करणाऱ्या कोणत्याही गोष्टींना परवानगी नाही. उघड्यावर मांस विक्री, कत्तलखाने किंवा कचरा टाकणे यावर बंदी आहे. मात्र, विमानतळाच्या अवघ्या काही मीटर परिसरातच विठ्ठलवाडी येथे उघड्यावर चिकन विक्री सुरू असल्याने नियमांचा सर्रास भंग होत आहे.







