टोरंटला विरोध, वृक्षतोडीविरोधात उठवला आवाज
|रायगड | कृषीवल टीम |
मराठी माणसाला बेसावध ठेवून सह्याद्री संपविण्याचं षडयंत्र रचलं जातंय. ज्यांच्यावर विश्वास ठेवून आपण ज्यांना निवडून दिलं ते महाराष्ट्राचे आमदार, खासदार सत्तेच्या पदासाठी, खुर्चीसाठी लाचार झालेत, अशी घणाघाती टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. कर्जत येथे टोरंट प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीविरोधात आवाज उठविण्यासाठी शुक्रवारी (दि. 28) आयोजित बचाव समितीच्या सभेत ते बोलत होते. मला सह्याद्री वाचवण्यासाठी इकडे यावे लागले, पण तुम्ही आघाडीवर राहिले पाहिजे, मी ठामपण्ो पाठीशी आहे. छत्रपतींचे नाव घेता तर मावळे म्हणून गप्प बसू नका, हे दिल्लीश्वर महाराष्ट्र लुटायला आले आहेत, थंड बसाल तर आपला सह्याद्री ओरबाडून टाकतील, त्यांच्यापुढे महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांचे काही चालत नाही, असा जाहीर आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
राज ठाकरे यांनी यावेळी आपल्या भाषणाची सुरुवात करताना इंटरनेट बंद केले आहे, पण सूर्य उगवायचा राहणार आहे, कर्जतमध्ये बंद करून ठेवले आहे. अख्ख जग बघतंय जनतेकडे, इंटरनेटचे काय करायचे. मनात काळे असेल तर अशा गोष्टी करायला सुचतात. सकाळी मी जंगलात गेलो होतो, तोडलेल्या झाडांचे ढीग बघून अतिशय वाईट वाटले. मला जंगलाच्या अंतिम संस्काराला आलो आहोत असे वाटले. जुनी झाडे कोणत्यातरी गुजरात्यासाठी कापून टाकत आहे, तो भय्या नाही, गुजराती आहे. या प्रकल्पाची काय गरज आहे, हे मला कोणी सांगणार आहे काय? असा सवाल करीत केंद्रात बसले आहेत ते यांना शून्य किंमत देत आहेत. राज्याचे सर्व निर्णय वरती ठरवत आहेत असे सांगून महाराष्ट्राचे वाटोळे करण्यासाठी तुम्हीच त्यांना मदत करताना जाती-धर्म आणि पैशाच्या जोरावर आपल्याला गुंडाळून घेतात. महिलांना दीड हजार रुपयात तोंड बंद करण्याचे काम हे करीत असून, राज्यात जे सत्तेवर बसले आहेत, त्यांच्या हातात काहीच नाही.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील, राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, मनसेचे युवा नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, संदीप देशपांडे, मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख शिवानी जंगम, संतोष जंगम, खालापूर तालुका चिटणीस किशोर पाटील, कर्जत तालुका चिटणीस तानाजी मते, पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी अन्य पदाधिकारी, कर्जत पर्यावरण बचाव समितीचे समन्वयक ॲड कैलास मोरे, राजेश लाड यांच्यासह शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मनसे रेल्वे युनियन अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी प्रास्तविक केले.
मुख्यमंत्र्यांवर टीका..
मुख्यमंत्री सांगतात केंद्राने आणि खासगी कंपनी यांनी सांगितले आणि आम्ही हा प्रस्ताव मान्य केला. याचा अर्थ, मुख्यमंत्री खरे बोलत असून, ते वरती जातात, शाह-मोदी यांना भेटतात आणि तेथून राज्याला आदेश दिले जातात. सत्तेची आणि पदाची भीती यांना आहे. त्यांच्याकडून मान खाली करून जातील असे आम्हाला आमचे सत्ताधारी नको आहेत.
तुम्ही हात जोडू नका
राज ठाकरे यांनी पाली सायडोंगर येथील महिलांना हात जोडण्याची वेळ येते, तुमच्या घरातील कोयते काय करतात, असा प्रश्न करीत तुम्ही फक्त फांद्या कापणार काय? असा सवाल करीत पालघर जिल्ह्यातील लाकूडतोडे यांना इशारा देताना तुम्ही इकडे येऊ नका नाहीतर… असा इशारा दिला.
23 पैकी तीन प्रकल्प केंद्राचे, बाकी खासगी
सह्याद्रीच्या कुशीत 23 प्रकल्प येत आहेत. त्यातील तीन प्रकल्प केंद्र सरकारचे असून, बाकी खासगी आहेत असे सांगून हे काय चालले आहे? असा प्रश्न उपस्थित करीत आम्ही पैसे तुम्हाला देतो, तुम्ही जंगल तोडून द्या, असे हे खासगी लोक सांगत आहेत. डेटा सेंटर गेट आहेत, त्यांना पाणी, वीज लागणार आहे. तेथे बाहेरून येणाऱ्यांसाठी ही तयारी सुरू आहे, असा जाहीर आरोप राज ठाकरे यांनी केला.
ग्रामीण जेन झी कुठे आहेत?
आता आपल्याला बेसावध राहून चालणार नाही, असे सांगून राज ठाकरे यांनी ग्रामीण भागातील जेन झी कधी जागे होणार? कधी उठणार? असा सवाल उपस्थित केला. तुम्ही थंड आणि शांतपणे हे सर्व सहन करणार असाल तर मला या ठिकाणी येऊन नेतृत्व करायचे नाही, असे सांगत छत्रपतींचे नाव घ्यायचे, मावळे म्हणता, मग गप्प का, असा सवाल राज ठाकरेंनी केला.
प्रकल्प थांबेल; पण…
प्रकल्प काही दिवसांसाठी थांबला तर ते आपली वीज बंद करतील आणि आपल्याला वीजपुरवठा बंद होण्याची भीती दाखवतील. वीज कमी पडते असे सांगून टोरंटची गरज आहे असे भासवतील आणि त्यानंतर प्रकल्प रेटला जाईल, अशी माहिती राज ठाकरेंनी यावेळी दिली.
जंगलातील पक्ष्यांनी कुठे जायचे?
आपण जंगल तोडले जात असताना शांत बसलो आहोत. पण, त्या झाडांवरील पक्षी आकाशात घिरट्या घालत आहेत. हे विदारक चित्र तेथे असून, भविष्यात आपल्यावरही अशी स्थिती येणार आहे. मग त्यावेळी आपण शांत बसून राहणार आहात काय, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. याविरोधात तरुणांनी पेटून उठायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.
छत्रपतींच्या आज्ञापत्राप्रमाण्ो वागणार आहेत?
आपण सर्वांनी आकाशात पाहावे आणि तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांना काय उत्तरे देणार, असा सवाल करीत जयंत्या साजऱ्या करायच्या का? असा प्रश्न उपस्थित करीत सोबत आणलेले छत्रपतींचे आज्ञापत्र वाचून दाखवले. ते आज्ञापत्र तुम्ही ऐकावे, असे आवाहन केले. हे पत्र सत्ताधारी ऐकणार असतील तर छत्रपतींचे तरी ऐकणार आहात काय? असा प्रश्न केला. सत्ताधाऱ्यांनी माझे ऐकू नये, पण छत्रपतींचे न ऐकणाऱ्या लोकांचे काय होणार?
मुख्यमंत्रीसाहेब, फक्त वकिली करा!
टोरंटची वकिली करणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दहा प्रश्न मला विचारायचे आहेत. त्यांची उत्तरे राज्यातील जनतेला मिळणार आहेत काय? त्यात प्रामुख्याने वीज संपन्न महाराष्ट्र असताना आणखी 13,000 मेगावॅट वीज कशाला पाहिजे, असा सवाल केला. हे सर्व एमएमआरमध्ये सुरू असून, भविष्यात एमएमआर गुजरात राज्याला जोडायचे आहे. त्यांच्यासाठी हा सर्व खटाटोप कशासाठी? जगात नाकारलेली डेटा सेंटर महाराष्ट्र राज्यात कशासाठी? पंप स्टोरेज प्रकल्प झाल्यावर हा प्रकल्प जगातील मोठा प्रकल्प असणार आहे, मात्र याच प्रकल्पांतून निर्माण होणारी वीज कोण वितरित करणार? कोणाला वितरीत करणार? असा प्रश्न असून, या प्रश्नांची उत्तरे आपण सर्वांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांना विचारायला हवी.
शहा देवाचे ऐका!
महाराष्ट्र खासगी लोकांना देण्याचे अमित शहा यांनी ठरवले आहे, असा आरोप केला. कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा आवाज येत नाही. त्यामुळे त्यांची काठी ज्यावेळी पडेल, त्यावेळी तुम्हाला जाग येईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. महाराष्ट्रावर संकट आले, तर आपण सर्वांनी एकत्र यायलाच हवे, असे आवाहन त्यांनी केले.
तरुणांनो, आपली वनसंपदा सोशल करू नका!
सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण-तरुणींकडून चांगले व्हिडिओ देण्यात येत आहेत. आपले हिरवेगार सोने आपण अशा व्हिडीओच्या माध्यमातून देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.
50 खोके दिले, वसूल करायचे कुठून?
महाराष्ट्रात काय चालले आहे याचा आपल्याला अंदाज आहे काय? 50 कोटी 40 आमदार फोडण्यासाठी दिले, त्याची सर्व बेरीज 2000 कोटी होते. ते त्यांना देण्यासाठी कुठून आले, असा प्रश्नदेखील यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केला. लोक काय म्हणतील अशी भीती केवळ राज्यातील भाजप वगळता सर्व पक्षांना असून, निवडणूक आयोग त्यांच्या पाठीशी आहे, त्याची हमी त्यांच्याकडे आहे आणि म्हणून तुम्ही पेटून उठायला हवे असे सांगून, थंड बसाल तर तुमचे जंगल हातातून निघून जाईल, असे इशारा राज ठाकरे यांनी दिला.
पोलिसांनो, जंगल तोडणाऱ्यांना साथ देऊ नका
छत्रपतींना उत्तर देणार असाल तर पेटून उठायला हवे आणि आपला हक्क अन्य कोणाच्या हाती द्यायचे नाही. राज्यात येणारे व्यवसाय आणि उद्योग-धंदे यांच्याविरोधात नाही असे सांगून तुमच्या घरात वैभव आले पाहिजे, त्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने ठरवले पाहिजे.जंगल तुटत आहे हे सांगण्यासाठी मी याठिकाणी आलो आहे, असे सांगत पोलिसांनी जंगल तोडणाऱ्यांना साथ देऊ नका, असे आवाहन केले. महाराष्ट्र मराठी माणसाच असून, मराठी माणसाच राहिला पाहिजे.
