पराभवानंतरही राजस्थान अव्वलच

लखनौने विजयरथ अडविला


| जयपूर | वृत्तसंस्था |


लखनौ सुपर जायंट्स संघाने राजस्थान रॉयल्सचा विजयरथ रोखला. आयपीएलच्या गुणतक्त्यातील अव्वल दोन संघांमधील लढतीत लखनौ सुपर जायंट्स संघाने 10 धावांनी बाजी मारली. चौथ्या विजयासह लखनौ सुपर जायंट्स संघाने 8 गुणांसह दुसरे स्थान कायम राखले. राजस्थान रॉयल्सचे दुसर्‍या पराभवानंतरही पहिले स्थान कायम राहिले.

काईल मेयर्सच्या धडाकेबाज 51 धावा, मार्कस स्टॉयनिसची अष्टपैलू चमक (21 धावा व 2/28) आणि वेगवान गोलंदाज आवेश खानची प्रभावी गोलंदाजी (3/25) लखनौ सुपर जायंट्स संघाच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. 155 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 86 या धावसंख्येवरून राजस्थान रॉयल्सला 6 बाद 144 या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.

दरम्यान, याआधी यशस्वी जयस्वाल व जॉस बटलर या फॉर्ममध्ये असलेल्या राजस्थानच्या सलामीवीरांनी याही लढतीत प्रतिमेला साजेशी खेळी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. कर्णधार संजू सॅमसन यालाही मोठी खेळी करता आली नाही. तो 2 धावांवरच धावचीत बाद झाला.

त्यानंतर स्टॉयनिस याने बटलरला 40 धावांवर बाद करून राजस्थानचा पाय खोलात नेला. गुजरातविरुद्धच्या लढतीतील हिरो शिमरॉन हेटमायरलाही या लढतीत ठसा उमटवता आला नाही. आवेश खानच्या गोलंदाजीवर तो आक्रमक फटका खेळण्याच्या नादात 2 धावांवर बाद झाला. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

लखनौचा कर्णधार के.एल.राहुल व काईल मेयर्स या सलामीवीरांनी 10.3 षटकांमध्ये 82 धावांची भागीदारी करताना राजस्थानच्या गोलंदाजांचे आव्हान परतवून लावले. दोघेही छान फलंदाजी करीत होते. मात्र जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर राहुल 39 धावांवर बाद झाला आणि जोडी तुटली. यानंतर लखनौची अवस्था 1 बाद 82 धावांवरून 4 बाद 104 धावा अशी झाली.

संक्षिप्त धावफलक
लखनौ सुपर जायंट्स 20 षटकांत 7 बाद 154 धावा (के.एल.राहुल 39, काईल मेयर्स 51, मार्कस स्टॉयनिस 21, निकोलस पुरन 29, रविचंद्रन अश्‍विन 2/23) विजयी वि. राजस्थान रॉयल्स 20 षटकांत 6 बाद 144 धावा (यशस्वी जयस्वाल 44, जॉस बटलर 40, आवेश खान 3/25, मार्कस स्टॉयनिस 2/28)

Exit mobile version