| माणगाव | प्रतिनिधी |
जयपूर राजस्थान येथे झालेल्या 34 व्या वरिष्ठ राष्ट्रीय वुशू स्पर्धेत माणगाव येथील राज्य शासनाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचा मानकरी ठरलेला ऋषिकेश मालोरे याने विशेष चमक दाखवीत प्रथम क्रमांक पटकावला. त्याने मिळविलेल्या या उज्वल यशाबद्दल त्याचे रायगड जिल्ह्यात सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील न्हावे गावचे प्रसिद्ध वकील ॲड.पुंडलिक मालोरे यांचा सुपुत्र ऋषिकेश पुंडलिक मालोरे हा वुशू खेळात तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर विशेष अशी चमक दाखवीत आहे. जयपूर राजस्थान येथे दि. 14 जून ते 19 जून दरम्यान 34 व्या वरिष्ठ राष्ट्रीय वुशू स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आपली छाप पाडीत उत्कृष्ठ असा खेळ सादर करून माणगावच्या ऋषिकेशने प्रथम क्रमांक पटकावला आणि माणगाव तालुक्यासह रायगड जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले. त्याने मिळविलेल्या या उज्वल यशाबद्दल त्याचे संपूर्ण माणगाव तालुक्यासह रायगड जिल्ह्यातून सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.