‘विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली’ हे महात्मा फुले यांचे वचन प्रसिध्द आहे. विद्या नसल्याने काय अनर्थ होतात याचे अचूक वर्णन त्यात आहे. पण फुल्यांच्या देशातील तरुणांनी हे वचन एकविसाव्या शतकात खोटे पाडायचा चंग बांधलेला दिसतो. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयूमध्ये रविवारी रामनवमीच्या दिवशी जी हाणामारी झाली ती पाहून विद्या असूनही विद्यार्थ्यांची मती कामातून गेली असे म्हणावे लागेल. या विद्यापीठात डाव्या संघटना व भाजपची अभाविपच यांच्यात नेहमीच संघर्ष चालू असतो. पण रविवारी ज्या कारणावरून हे सर्व रामायण घडले तो म्हणजे सुविद्य म्हणवणार्यांनी बुद्धीभ्रष्टतेचा कसा कळस गाठला आहे याचा नमुना होता. घडले ते असे- रामनवमीनिमित्त अभाविपच्या विद्यार्थ्यांनी कावेरी हॉस्टेलमध्ये होम-हवनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. अन्य काही विद्यार्थ्यांनी रविवार असल्याने त्याच ठिकाणी नेहमीप्रमाणे चिकनचा बेत केला होता. त्याला काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. त्यातून दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली व बर्याच जणांची डोकी फुटली. मात्र मांसाहाराला आपला विरोध नव्हता असा खुलासा अभाविपने आता केला आहे व या सर्व प्रकाराची जबाबदारी डाव्या संघटनांवर टाकली आहे. पण सध्या चैत्री नवरात्रानिमित्त मटणाची दुकाने बंद करण्याची मागणी करणारे लोक भाजप परिवारातीलच आहेत. मुंबईतही यांचेच भाईबंद मासे खाणार्या मराठी लोकांना सोसायट्यांमध्ये घरे घेऊ देत नाहीत. तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र इत्यादी राज्यांमध्ये जवळपास 98 टक्के लोक हे मांसाहारी आहेत व ते अगदी सणसमारंभांनाही मांस खातात. देव-देवतांच्या विविध उत्सवांमध्ये मटन हाच प्रसाद असतो हे मराठी लोकांना तरी सांगायला नको. आपल्याकडे गणपतीच्या काळात गौरींसाठी एक नैवेद्य शाकाहारी तर दुसरा मांसाहारी केला जातो. पण हिंदुत्ववादी म्हणवणार्या भाजपला हे हिंदू वैविध्य नको आहे. दुसरे म्हणजे, मुळात जेएऩयू हे एक विद्यापीठ आहे. ती एक सार्वजनिक जागा आहे. तिथे होमहवन करणे हाच मुळात आक्षेपार्ह प्रकार आहे. समजा मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्माचे असेच काही धार्मिक कार्यक्रम होत असतील तर तेही निषेधार्ह आहेत. धार्मिक कर्मकांडं ही घरापुरतीच मर्यादित राहायला हवीत. आणि त्यात समजा एकाने गाय मारली म्हणून दुसर्याने वासरू मारणे हे काही शहाणपणाचे नाही. सण साजरे करणे आणि पूजा किंवा होमहवन करणे यातही फरक करायला हवा. रामनवमीनिमित्त हवन, तेही आंतरराष्ट्रीय विद्यापीठासारख्या ठिकाणी आयोजित करणे हा निव्वळ राजकीय चिथावणी देण्याचा प्रकार आहे. त्यात धर्माचा वा श्रध्देचा काहीही संबंध नाही. विशेष म्हणजे हेच लोक परवापर्यंत हिजाबवरून गहजब करीत होते आणि कोर्टाच्या निर्णयाचा दाखला देत होते. आज हे होमहवन विद्यापीठात झाले, उद्या सरकारी कार्यालये व मंत्रालयांमध्ये सुरू होईल. कदाचित त्यात भाग घेणे सर्वांना अनिवार्य केले जाईल. हा एक ठरवून केलेला माथेफिरूपणा आहे. विद्यापीठ प्रशासनानेच खरं तर हा प्रकार रोखायला हवा होता. पण कुलगुरूही यांचीच री ओढणारे असतील तर काय घडणार? यांच्यातले अनेक विद्यार्थी उद्या अमेरिका व इतर पाश्चात्य देशांमध्ये जातील. तेथे ते आपले आग्रह चालू ठेवू शकतील काय याचा त्यांनी विचार करावा. ऑक्सफर्ड किंवा एमआयटीमध्ये विद्यार्थ्यांची असली थेरं चालू दिली जातील? उच्च शिक्षणामधून माणसाचे मन अधिक विशाल होणे अपेक्षित असते. पण जेएनयूतील अभाविपवाल्यांनी हे शिक्षण अजिबात अंगी लावून घ्यायचे नाही असे ठरवलेले दिसते. त्यामुळेच ते दर काही दिवसांनी हिंदू विरुद्ध मुस्लिम पध्दतीचे बखेडे उभे करताना दिसतात. इतरांपेक्षा चार नव्हे तर चारशे बुकं शिकलेल्या या विद्यार्थ्यांची ही गत असेल तर विद्येनेच त्यांची मती आणि नीती मारली गेली आहे असे म्हणावे लागेल. एकीकडे आपण विज्ञान व तंत्रज्ञानात चीनसारख्या देशांशी स्पर्धा करण्याची स्वप्ने पाहतो. तर दुसरीकडे आपले विद्यार्थी असल्या वादांमध्ये अडकून आयुष्य वाया घालवत आहेत. फुल्यांनी वर्णन केल्यापेक्षाही हा भयंकर अनर्थ आहे.
विद्या असूनही मती गेली?

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी - भाग 1
by
Antara Parange
July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
by
Antara Parange
April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
by
Antara Parange
March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
by
Antara Parange
March 8, 2025