पाऊस पडूनही श्रीवर्धनला पाणीटंचाई

| श्रीवर्धन | वार्ताहर |

गेल्या अनेक वर्षांच्या पाहणीतून असे निष्पन्न होते की, श्रीवर्धन तालुक्यात कितीही पर्जन्यवृष्टी झाली. तरीही पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्यामुळे एप्रिल महिन्याच्या अखेरीपासून तालुक्यामध्ये तसेच श्रीवर्धन शहरात पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात होते. यावर कायमस्वरुपी उपाययोजना आखण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

श्रीवर्धन शहर व आजूबाजूच्या खेडेगावात पाणी पुरवठा करण्यासाठी रानवली येथे असलेला एकच पाझर तलाव उपलब्ध आहे. साधारण 1970 सालानंतर या पाझर तलावाची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी श्रीवर्धन शहराची तसेच आजूबाजूच्या परिसराची लोकसंख्या अत्यल्प होती. त्यामुळे पाणी पुरत असे. परंतु आज मीतीला श्रीवर्धन शहरासह आजूबाजूच्या परिसरात देखील पूर्वीच्या लोकसंख्येपेक्षा चार पट लोकसंख्या झालेली आहे.

आराठि ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनेक टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या असून तीन मजल्यांच्या अनेक इमारती आहेत. या सर्व इमारतींना रानवली पाझर तलावा मधूनच पाणीपुरवठा करण्यात येतो. इतके दिवस या पाझर तलावाच्या पाझरणार्‍या पाण्यातूनच पाणीपुरवठा करण्यात येत असे. त्यामुळे अनेक नागरिक सर्रासपणे उन्हाळ्यात रस्त्यावरती पाणी मारणे, आपल्या चारचाकी, दुचाकी गाड्या त्या पाण्याने धुणे. याशिवाय वारंवार आपले दुकान गाळे धुऊन काढणे यासाठी पाण्याचा वापर करत असत. श्रीवर्धन शहरासह आजूबाजूच्या परिसरात अनेक वेळा नागरिक रबरी पाईप लावून धरणाचे पाणी झाडांना देखील सोडण्याचे प्रकार घडत होते. परंतु आता या पाझर तलावाच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे. तसेच रानवली पाझर तलावापासून श्रीवर्धन पर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

जलशुद्धीकरण प्रकल्प अस्तित्वात आल्यानंतर श्रीवर्धन नगरपरिषद व आजूबाजूच्या परिसरात नागरिक वापरत असलेल्या पाण्याला मीटर बसवण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून नागरिकांकडून पाण्याचा अपव्यय होणार नाही. एप्रिल महिन्यापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने अनेक नागरिक थेट जलवाहिनीला विद्युत पंप बसवून पाणी खेचत असल्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. किंवा काही भागांमध्ये पाणीपुरवठा होतच नाही. मात्र नळ जोडणी धारकांना मीटर बसवल्यानंतर पंपाने पाणी खेचणे देखील परवडण्यासारखे नाही. त्यामुळे या गोष्टीवर देखील चाप बसणार आहे. श्रीवर्धन तालुक्यात असलेल्या रानवली, जसवली, भोस्ते, आराठी या ग्रामपंचायतीमध्ये देखील रानवली धरणाचे पाणी उपलब्ध करण्यात येते. त्या ठिकाणी देखील पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

त्याच प्रमाणे श्रीवर्धन नगरपरिषदेने देखील पाण्याचे नियोजन योग्य प्रकारे करून नागरिकांना पुढील वर्षीचा पाऊस सुरू होईपर्यंत पाणी उपलब्ध होईल याबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे. श्रीवर्धन शहर हे समुद्रकिनार्‍यालगत वसलेले असून याठिकाणी विहिरींना असणारे पाणी मचूळ चवीचे आहे. तसेच रानवली पाझर तलावामधून येणारे पाणी गोडे आहे. त्यामुळे नागरिकांकडून या पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जात असे. मात्र जलशुद्धीकरण प्रकल्प नसल्यामुळे अनेक नागरिक हे पाणी उकळून, गाळून पीत असत. जलशुद्धीकरण प्रकल्पातून येणारे पाणी वितरित करताना नगरपरिषदेने त्या ठिकाणी मीटर न बसविल्यास पाण्याचा अपव्यय नागरिकांकडून होणे नाकारता येत नाही. सद्यस्थितीत श्रीवर्धन नगरपरिषद सर्व नागरिकांना एकाच रकमेचे पाणी बिल वर्षातून वसूल करत असते. परंतु मीटर प्रमाणे पाणी वापरानुसार बिल वसूल केल्यास पाण्याच्या वापरावरती निश्‍चित निर्बंध येतील.

Exit mobile version