पर्यावरण रक्षणाच्या घोषणांचा दिखावा?
| उरण | प्रतिनिधी |
एकीकडे पर्यावरण वाचवा, कांदळवन जपा, झाडे लावा असा उपदेश शासनाकडून केला जात असताना, दुसरीकडे उरण तालुक्यात कांदळवनाची कथित कत्तल, भराव आणि झाडांची तोड करून बांधकामे उभी राहात असल्याच्या तक्रारींनी प्रशासनाच्या पर्यावरण संवर्धनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उरण तालुक्यातील काही ग्रामपंचायत हद्दींमध्ये समुद्रकिनारी असलेल्या खारफुटीची कथित तोड करून मोठ्या प्रमाणात भराव करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. या भरावानंतर बांधकामे उभी राहत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. कांदळवन हे किनारपट्टीचे नैसर्गिक संरक्षण कवच असताना त्याच्यावर घाव घातला जात असेल, तर भविष्यातील पर्यावरणीय संकटाची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित होत आहे. दुसरीकडे उरण नगरपालिका हद्दीत झाडांची तोड करून टॉवर उभारले जात असल्याच्या तक्रारीही आहेत. हिरवाई कमी होत असताना काँक्रीटचे जंगल मात्र वाढत असल्याचे चित्र आहे. विकासाच्या नावाखाली झाडे तोडायची आणि मोकळ्या जागांवर टॉवर उभे करायचे, तर पर्यावरण संवर्धनाचे धडे केवळ सामान्य नागरिकांनीच घ्यायचे का, असा संतप्त सवाल उरणकरांकडून होत आहे.
गणेशोत्सवात कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करा, पर्यावरण वाचवा असे आवाहन करणाऱ्या प्रशासनाने उरणच्या कांदळवन आणि हिरवाईच्या रक्षणासाठीही तितकीच कठोर भूमिका घ्यावी. उरणची कांदळवने, हिरवाई आणि समुद्रकिनारा हा बेकायदा भराव आणि बांधकामांसाठी मोकळा भूभाग नाही. त्यामुळे संवेदनशील भागांची तातडीने संयुक्त पाहणी करून कथित अनधिकृत कामांची चौकशी करावी, वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
