। नेरळ । प्रतिनिधी ।
खोपोली येथून मुंबईकडे निघालेली उपनगरीय लोकलमध्ये भिवपुरी रोड आणि नेरळ या दोन स्थानकाच्या दरम्यान तांत्रिक कारणाने थांबली होती. भिवपुरी रोड येथून पाच वाजून सात मिनिटांनी नेरळकडे येण्यासाठी निघालेल्या उपनगरीय लोकल खाली गाय आली होती आणि त्यानंतर ही उपनगरीय लोकल नेरळ फाटक येथे जवळपास सव्वा तास थांबून राहिली होती. दरम्यान, तांत्रिक कारणाने खोळंबल्या लोकलमुळे मुंबईकडे जाणार्या दोन लांब पल्ल्याच्या गाड्या यांना थांबून राहावे लागले होते.
खोपोली येथून मुंबई सीएसएमटी साठी निघालेली उपनगरीय लोकल भिवपुरी रोड रेल्वे स्थानकातून नियोजित वेळेत नेरळ असा प्रवास करीत होती. त्यावेळी नेरळ स्थानकाच्या 300 मीटर मागे असताना या लोकल खाली गाय आली आणि उपनगरीय लोकल थांबून राहिली. त्यावेळी मृत गायीला बाहेर काढले पण उपनगरीय लोकल काही पुढे जाईना. त्यानंतर लोकल पुढे नेण्यासाठी कल्याण येथून अतिरिक्त इंजिन लावून बंद पडलेली उपनगरीय लोकल पुढे नेण्यासाठी आणले जात आहे अशी माहिती रेल्वे कडून देण्यात आली. त्यानंतर पावणे सात वाजता संबंधित लोकल नेरळ स्थानकात पोहचली.
उपनगरीय लोकल बंद पडून खोळंबून राहिल्याने त्या लोकल च्या मागे असलेली पुणे- मुंबई डेक्कन एक्प्रेस, कर्जत- मुंबई लोकल आणि इंदोर एक्सप्रेस या गाड्या खोळंबून राहिल्या होत्या. तर सदर लोकल थांबून राहिली त्या ठिकाणी रेल्वे फाटक आहे. लोकल जवळपास दीड तास थांबून राहिल्याने त्या फाटकात वाहनांच्या रांगा थेट दीड ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत लागल्या होत्या. पश्चिम भागातील रांगा बाजारपेठ पर्यंत तर कोल्हारे खिंड आणि साई मंदिर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे त्या लोकलमुळे लोकल प्रवासी तसेच वाहने यांना देखील खोळंबून राहावे लागले.
तांत्रिक कारणाने लोकलचा खोळंबा
