महाराष्ट्र अंनिसची निर्धार सभा

| पनवेल | वार्ताहर |

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खूनाला अकरा वर्षे होत आलेली असताना त्यांच्या खटल्याचा निकाल आला. मात्र, त्या निकालाने सर्वच संवेदनशील नागरिक निराश झाले. प्रत्यक्ष मारेकरी असलेले सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाली तर विरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. मारेकऱ्यांना शिक्षा झाली याचे समाधान व्यक्त होत असतानाच सूत्रधार मोकळे राहिले याची खंतही व्यक्त केली जात आहे. ही खंत व्यक्त करणारी निर्धार सभा महा. अंनिस पनवेल शाखेने आयोजित केली होती. या सभेस प्रमुख उपस्थिती महा. अंनिस राज्य उपाध्यक्ष डॉ. प्रदीप पाटकर, ॲड. तृप्ती पाटील यांची लाभली.

सुरुवातीस महेंद्र नाईक, प्रशांत ननावरे, रोहिदास कवळे, तनुश्री खातू, नाजुका सावंत, पूजा डांबरे यांनी निषेध व निर्धारपर मनोगत व्यक्त केले. ॲड. तृप्ती पाटील यांनी कायद्याचे धोडक्यात विश्लेषण केले. निकालातील समाधानकारक गोष्टी तसेच न्यायालयाने तपासयंत्रणेवर कोणत्या गोष्टींवर ताशेरे ओढले हे स्पष्ट केले. तसेच कोणती कलमे लावली व त्यांचे स्वरूप स्पष्ट केले. डॉ. पाटकर यांनी समाज, कार्यकर्ते यांची मानसिक अवस्था मांडली. गांधींच्या खूनानंतर उमटलेल्या प्रतिक्रिया आणि डॉक्टर दाभोलकरांच्या खूनानंतर उठलेल्या प्रतिक्रिया यातला फरक पाहता आपण अधिक विवेकी वागत आहोत असे ते म्हणाले. आपण समाजालाही समजून घ्यायला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

Exit mobile version