शेकाप मध्यवर्ती समितीच्या बैठकीला सांगोल्यात प्रारंभ
सांगोला | माधवी सावंत | जितेंद्र जोशी |
महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी,नव्या पिढीतही पुरोगामी विचार रुजविण्यासाठी भविष्यात शेतकरी कामगार पक्षाचे संघटन आणखी मजबूत करण्याचा निर्धार सांगोला येथे सुरु असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीत करण्यात आला.
शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीला शनिवारी दुपारी 2 वाजता शेकाप सरचिटणीस आम.जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ झाला आहे. या बैठकीत पुढील दोन दिवस पक्षबांधणीच्या कामाचे नियोजन तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलनाची आखणी करणे आदी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती बैठकीला रायगड जिल्ह्यातून पक्षाचे सुमारे 500 प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित राहिले असल्याची माहिती शेकाप जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील यांनी दिली.बैठकीच्या प्रारंभी ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख,क्रांतीवीरांगणा हौसाक्का पाटील,सुलभाकाकू पाटील आदी मान्यवरांना आदरांजली वाहण्यात आली.
राज्य मध्यवर्ती समितीची बैठकीला आ बाळाराम पाटील, कार्यालयीन चिटणीस राजू कोरडे,प्रा. एस व्ही जाधव, माजी आम.धैर्यशील पाटील, संपतबापू पवार, राहुल पोकळे, चंद्रकांत देशमुख,डॉ अनिकेत देशमुख,रायगड जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील , रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील आदी मान्यवर उपस्थित आहेत.
बैठकीच्या प्रारंभी ज्येष्ठ नेते प्रा.एस.व्ही जाधव यांनी प्रास्ताविक करताना शोषण विरहीत समाजाची निर्मिती तसेच सावकारशाही व पुरोहितशाही मधून समाजाची मुक्तता करणे हा शेकापचा उद्देश आहे.पक्ष संघटना सक्रीय करण्यासाठी तरुणांचा सहभाग वाढविणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश असल्याचे नमूद केले.
पक्षाच्या पुनर्बांधणी साठी करावयाच्या उपाययोजना, पक्षाच्या वर्गीय संघटना कार्यरत करणे, शेती नुकसानभरपाई ,विज दरवाढ तसेच केंद्राकडून आणण्यात येत असलेले वीज विधेयक याला विरोध करणे, मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण, कृषी कायदे मागे घ्यावेत, तसेच केंद्रांने कामगार कायद्यात बदल करून मंजूर केलेले लेबर कोड मागे घ्यावेत,कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करणे अशा विविध विषयांवर या बैठकीत विचारमंथन करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे राज्य कार्यालयीन चिटणीस राजू कोरडे यांनी दिली आहे.
सोशल मिडिया पद आवश्यक
महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास 12 कोटी आहे. त्यातील 50 टक्के नागरिक सोशल मिडियासोबत जोडलेला आहे. त्यामुळे येत्या काळात पक्ष संघटनाच्यादृष्टीने शेतकरी कामगार पक्षाचे सोशल मिडिया हे पद निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत शेकाप रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी या बैठकीत केली.
गावपातळीपासून संपूर्ण महाराष्ट्रात हे पद निर्माण केले पाहिजे. आजच नाही तर गेली अनेक वर्षे शेकाप जे समाजकारण करीत आहे, तितकं काम अन्य कोणताही पक्ष करीत नाही. मात्र तरीही शेकाप कुठेही दिसत नाही. त्यामुळे 12 कोटी नागरिकांपर्यंत पोहोचायचे असेल तर सोशल मिडिया हे प्रभावी माध्यम असल्याचेही चित्रलेखा पाटील यांनी उपस्थितांच्या नजरेत आणून दिले.