। श्रीवर्धन । वार्ताहर ।
विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासासाठी संभाषण कौशल्य विकसित करावे, अस आवाहन करिअर प्लेसमेंट एनआयआयटी, मुंबईचे मुख्याधिकारी आशिष अमलवार यांनी केले. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या श्रीवर्धन येथील महाविद्यालयात करिअर गायडन्स विभागांतर्गत करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. प्रारंभी प्रा. राजू गोरुले यांनी प्रास्ताविक करताना या कार्यशाळेच्या आयोजनाची भूमिका व उद्देश स्पष्ट केला. प्रा.राजू गोरुले यांनी प्रास्ताविकात स्पष्ट केली. उपस्थित मान्यवरांचा प्राचार्य डॉ. श्रीनिवास जोशी यांनी शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला.
महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व रोजगार या संदर्भात अनेक यशस्वी अधिकार्यांचे व व्यावसायिकांचे मार्गदर्शन घेतले जाते व सर्वागीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो, असे विचार प्राचार्य डॉ. श्रीनिवास जोशी यांनी मांडले. ग्रामीण भागातील विद्यार्थी जागतिकीकरणच्या स्पर्धेत कमी का पडतो? आत्मविश्वास व संभाषण कौशल्य विकसित करण्यासाठी काय करावयास हवे, यासंदर्भात आशिष अंमलवार यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यशाळेचे यशस्वी करण्यासाठी प्रा. निलेश चव्हाण, प्रा. राजू गोरुले, डॉ. योगेश लोखंडे, प्रा. नवज्योत जावळेकर यांनी परिश्रम घेतले. डॉ.योगेश लोखंडे यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी प्रयत्नशील होते.