थळकरांचा संताप उसळणार, फलकांवरचा विकास संपणार
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
थळ जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणूक जवळ येत असताना सत्ताधारी गटाकडून विकासाचे ढोल जोरात वाजवले जात आहेत. फलक, बॅनर, उद्घाटनांचे फोटो आणि कोट्यवधींच्या निधीच्या घोषणा यांचा पाऊस पडतो आहे. मात्र या गोंगाटाच्या आड थळची जनता एकच प्रश्न विचारत आहे, हा विकास नेमका कुणासाठी?
आमदारांच्या गावात अर्थात थळ जिल्हा परिषद मतदारसंघात विकास झाला, असे जर कुणी आजही छातीठोकपणे सांगत असेल, तर तो निव्वळ असत्याचा निर्लज्ज प्रचार आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला, कामे कागदावर पूर्ण झाली, उद्घाटनांचे नारळ फुटले; पण थळमधील गावागावात फिरले की एकच प्रश्न उभा राहतो तो म्हणजे विकास नेमका कुठे आहे? रस्ते अजूनही चिखलात, पाणी अजूनही टँकरवर, आरोग्य सुविधा अजूनही तोकड्या आणि शिक्षण व्यवस्था अजूनही दुर्लक्षित. मग हा विकास जनतेसाठी आहे की काही निवडकांच्या खिशासाठी? हा विकास नव्हे, तर विकासाच्या नावाखाली केलेली निर्लज्ज थट्टा आहे.
थळचा विचार केला तर विकासकामांचा दर्जा इतका सुमार आहे की पहिल्याच पावसात कामांचे खरे स्वरूप उघडे पडले. निकृष्ट साहित्य, अपूर्ण प्रकल्प आणि निधीची संशयास्पद उधळपट्टी हे सगळे उघड दिसत असतानाही प्रशासन गप्प का आहे? की प्रशासनालाही या लुटीत भागीदार केले गेले आहे?
तक्रारी दाखल होतात, पण चौकशी फक्त फाइलमध्येच होते. दोषी मोकाट, आणि नागरिक मात्र त्रस्त हेच थळचे आजचे वास्तव आहे. थळ जिल्हा परिषद मतदारसंघात प्रश्नांची यादी संपत नाही. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, रोजगार, असे अनेक प्रश्न आ वाचून उभे आहेत. पण सत्ताधाऱ्यांकडे उत्तरांची कमतरता आहे. निधी कुठे गेला, कामे कुणाच्या फायद्यासाठी झाली, आणि जनतेला नेमके काय मिळाले याचे उत्तर कोण देणार?
राजकीय फेरफटका या सदरामध्ये थळ जिल्हा परिषद मतदारसंघातील विकासाच्या नावाखाली सुरू असलेली फसवणूक, प्रशासनाची मूक संमती आणि लोकप्रतिनिधींचे अपयश उघड करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण यावेळी निवडणूक केवळ उशेदवारांची नाही तर ती थळच्या जनतेच्या संयमाची आणि सत्ताधाऱ्यांच्या पापांची आहे. फलकांवरचा विकास पुरे झाला; आता मतपेटीतून त्याचा अंतिम निकाल लागणार आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे सानिका सुरेश घरत तर शिंदे गटाकडून मानसी दळवी यांच्यात लढत होणार आहे. सुशिक्षित आणि निष्कलंक चेहरा म्हणून सानिकाचे पारडे जड असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. तर शिवीगाळ करणाऱ्या, अधिकाऱ्यांवरही हात उचलणाऱ्या मानसी दळवी यांच्या हुकूमशाहीला जनता त्रस्त असल्याचेही बोलले
जात आहे. या पार्श्वभूमीवर थळची निवडणूक ही केवळ दोन उमेदवारांमधील लढत राहिलेली नाही. ती सत्तेच्या माजाविरुद्ध जनतेच्या संयमाची परीक्षा बनली आहे. फलकांवर दाखवलेला विकास आता पुरे झाला. जनता आता प्रत्यक्ष आयुष्यातील विकासाचा हिशेब मागत आहे.
महाविकास आघाडीकडून सानिका सुरेश घरत आणि शिंदे गटाकडून मानसी दळवी यांच्यात ही लढत होणार आहे. सुशिक्षित, निष्कलंक आणि अभ्यासू चेहरा म्हणून सानिका घरत यांना पाहिले जात आहे. तर दुसरीकडे शिवीगाळ, अधिकाऱ्यांवर दबाव, वादग्रस्त वर्तन आणि हुकूमशाही कारभारामुळे जनतेत मानसी दळवीविरोधात अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे. आता फलकांवरचा विकास लवकरच संपेल. मतपेटीतून निश्चितच चांगले उत्तर मिळेल, आणि ते उत्तर स्फोटक असेल, याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी आणि जिल्हा परिषद सदस्या मानसी दळवी यांच्या कार्यकाळात थळ जिल्हा परिषद मतदारसंघ कायम दुर्लक्षित राहिल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. मागील अनेक वर्षांपासून विकासाच्या नावावर केवळ आश्वासनांची पुनरावृत्ती झाली असून प्रत्यक्षात मात्र मतदारसंघात मूलभूत सुविधांचा अभाव कायम असल्याची भावना जनतेत तीव्र होत
चालली आहे. थळ परिसराची लोकसंख्या सातत्याने वाढत असताना रोजगाराच्या संधी मात्र निर्माण झालेल्या नाहीत. स्थानिक तरुणांसाठी उद्योग, प्रशिक्षण किंवा रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. शुद्ध आणि मुबलक पाण्याची सोय आजही अनेक गावांमध्ये नाही. उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून ही समस्या वारंवार मांडूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी आहेत. रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून दळणवळणाचा प्रश्न गंभीर
बनला आहे.स्थानिक नागरिकांचे आरोप आहेत की, जमिनीच्या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाले आहेत. बलाढ्य अशा आरसीएफ कंपनीतही भूमिपुत्रांना डावलून बाहेरच्यांना प्राधान्य देण्यात आले. पर्यटन, शेती, मासेमारी अशा क्षेत्रांमध्ये स्थानिकांच्या हक्कांचे संरक्षण झालेले नाही. आमदार आणि जिल्हा परिषद सदस्या यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागले नाहीत, उलट लोकप्रतिनिधी भेटीगाठी टाळत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. या समस्यांमुळे थळ जिल्हा परिषद मतदारसंघात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून आता केवळ शब्दांवर नव्हे तर प्रत्यक्ष काम करणारे नेतृत्व हवे, अशी ठाम भूमिका मतदारांकडून घेतली जात आहे. विकासापासून वंचित राहिलेल्या थळसाठी परिवर्तन अपरिहार्य असल्याची चर्चा मतदारसंघात जोर धरू लागली आहे.
थळमधील अनेक योजना अपूर्ण
पूर्वी थळ जिल्हा परिषद मतदार संघ होता. या मतदार संघातून आमदार दळवीदेखील निवडून आले आहेत. मात्र या गावांचा विकास पाहिजे तसा झाला नसल्याची चर्चा सध्या जोरात सुुरू आहे. आमदार दळवी यांचे गावातील रस्ते आजही खडतर आहेत. सायमन कॉलनीकडे जाणारा रस्त्याची दुरुस्ती दरवर्षी केली जाते. मात्र आजही हा रस्ता खडतर आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खडड्यातून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. स्वतःच्या गावातील पाण्याची योजना अजूनही अपूरीच आहे. मात्र तक्रार करणाऱ्यांवर दहशत निर्माण करण्याचे काम केले जात आहे, अशी चर्चा आहे. थळमधील पाण्याचे टँकर पूर्णंतः खराब झाले आहेत. अनेक योजना अपूर्णच आहेत. त्याच नाहक त्रास सर्वसामान्याना होत आहे थळ परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचा ढिगारा साचला आहे त्यामुळे आरोग्याचा ही प्रश्न गंभीर झाल्याची चर्चा आहे.
एमआयडीसीच्या रस्त्याची अवस्था बिकट
एमआयडीसीचा रस्ता अद्याप ही खराब आहे. या रस्त्याची अवस्था बिकट आहे.ठिकठिकाणी खड्डयांचे साम्राज्य आहे. त्यामुळे अनेक वेळा रस्त्यावरून खड्डे चुकविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याच रस्त्याच्या बाजूला नळ योजनेसाठी खोदकाम करण्यात आले आहे. मात्र हे कामदेखील अपूरेच आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. करोडो रुपयांचा निधी आणल्याचा दावा करणाऱ्या आमदारांचे स्वतःच्या गावांच्या विकासाकडेच दुर्लक्ष असल्याची चर्चा आहे.
