विकासाचे मॉडेल वेश्‍वी ग्रामपंचायत; पाच कोटी रुपयांची विकास कामे केली

गोंधळपड्याच्या विकासावर दीड कोटी रुपये खर्च

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

विकास काय असतो हे शेकापने सातत्याने आपल्या कार्यशैलीतून दाखवून दिले आहे. वेश्‍वी ग्रामपंचायतीमध्ये आजपर्यंत सर्वांना विश्‍वासात घेऊन पाच कोटी रुपयांहून अधिक विकासकामे केली आहेत. त्यामध्ये रस्ते, पाणी, वीज, अत्याधुनिक जीम, ओपन जीम, स्मशानभूमी, हायमास्टचे दिवे, स्ट्रीट लाईट अशा विविध सोयी-सुविधांचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळेच विरोधकांना आतापासूनच पराभवाची धडकी भरली आहे, असे प्रतिपादन शेकापचे नेते तशा वेश्‍वी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाचे उमेदवार प्रफुल्ल पाटील यांनी केले.

विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही कधीच तडजोड केली नाही. गेल्या पाच वर्षांत तत्कालीन सरपंच आरती प्रफुल्ल पाटील यांच्या नेतृत्वात शेकापचे नेते प्रफुल्ल पाटील यांनी विकासाची गंगा वेश्‍वी ग्रामपंचायतीमध्ये आणली आहे. गावाचे राजकारण करताना आम्ही कधीच हेवेदावे केले नाहीत, विरोधकांचीही कामे केली आहेत. आमचे नेते शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील हे नेहमीच आम्हाला सांगतात, “विकास करताना कधीच राजकारण करायचे नाही.” त्याच पावलावर माझी पत्नी आरती पाटील आणि मी पाऊल टाकत आलो आहोत, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

गेल्या पाच वर्षांत विकासाचे एक कोणतेही काम आम्ही शिल्लक ठेवलेले नाही. विरोधकांना आता दुसरे काहीच काम उरलेले नाही. त्यामुळे ते फक्त टीका करतात, असा घणाघात प्रफुल पाटील यांनी केला.

वेश्‍वी ग्रामपंचायतीमध्ये सर्वांना सोबत घेऊन विकासकामे केली आहेत. सर्वांना सोबत घेतले नसते, तर आजची वेश्‍वी ग्रामपंचायत आदर्शवत मॉडेल ठरली नसती, याकडेही प्रफुल्ल पाटील यांनी लक्ष वेधले. ग्रामपंचायतीला आणि पर्यायाने गावातील नागरिकांना विकासाच्या वाटेवर नेत असताना अनेक विघ्न आली होती. मात्र, कोठेही न डगमगता विकासाच्या ध्येयाकडे वाटचाल केली. कणखरपणे मार्गक्रमण केल्यामुळेच गावात केंद्र, राज्य, जिल्हा परिषदेच्या विविध योजना आणता आल्या आणि त्या प्रभावीपणे राबवता आल्याचेही प्रफुल्ल पाटील यांनी आवर्जून सांगितले.

विकासाचे वारे फक्त वेश्‍वी गावातच वाहत नव्हते, तर गोंधळपाडा हद्दीतदेखील विकासाचा डोंगर उभा करता आला आहे. आतापर्यंत एकट्या गोंधळपाड्यात दीड कोटींहून अधिक रकमेची विकासकामे करण्यात आली आहेत.

गावात कोणाच्याही सुख-दुःखात सहभागी होणारे असाधारण नेतृत्व म्हणजे प्रफुल पाटील अशी ओळख या गावातील सर्वसामान्यांनीच दिली आहे. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी झालो नसतो तर नागरिकांनी माझ्या कुटुंबावर कायम विश्‍वास दाखवला नसता. गावातील प्रत्येक नागरिकाच्या भल्याचा कायमच ध्यास घेतला आहे. माझी ताकद हे माझे सर्व कार्यकर्ते आणि माझ्यावर विश्‍वास असणारी सर्व जनता आहे. वेश्‍वी ग्रामपंचायतीच्या विकासासाठी, उद्धारासाठी कायमच कटिबद्ध आहोत, असेही प्रफुल्ल पाटील यांनी स्पष्ट केले.

गोंधळपाड्यातही विकासकामे
एकट्या गोंधळपाडा विभागाचा विचार केला तर, या ठिकाणी फक्त रस्ते विकासासाठी 59 लाख 42 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच अन्य बांधकाम (निवारा शेड, गटार, स्ट्रीट लाईट, पाणी टाकी, शाळा रंगकाम, पाईपलाईन) यासाठी 52 लाख 87 हजार अस रुपये खर्च करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अन्य विकासकामे धरून दीड कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत.

Exit mobile version