महाडच्या 29 ग्रामपंचायतींवर प्रशासक
| महाड | वार्ताहर |
राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, जानेवारी ते मार्च 2024 ला मुदत संपणार्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका वेळेत घेणे शक्य होत नसल्याने या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. महाड तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीचा कारभार आता प्रशासकाच्या ताब्यात गेला आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांनी आपल्या अधिकारानुसार, येथे प्रशासकांची नेमणूक केली आहे. नेमलेल्या प्रशासकही महाड पंचायत समितीचे अधिकारी आहेत.
महाड तालुक्यात 134 ग्रामपंचायती असून त्यापैकी 29 ग्रामपंचायतींची जानेवारी ते मार्च 2024 ला संपली आहे. निवडणूक प्रक्रियेत असलेल्या ग्रामपंचायती बहुसंख्येने महत्त्वाच्या असल्याने आगामी विधानसभा निवडणुकांची पूर्वतयारी म्हणूनही या ग्रामपंचायत निवडणुकांकडे पाहिले जात आहे. बदललेल्या राजकीय गणिताचे भवितव्यही या निवडणुका ठरवणार आहेत. परंतु राज्य निवडणूक आयोगाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. त्यामुळे या सर्व 29 ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकाच्या ताब्यात गेला आहे.
29 ग्रामपंचायतींसाठी नऊ प्रशासक ग्रामपंचायती 29 असल्या तरी कामकाज सांभाळणारे प्रशासक केवळ नऊ आहेत त्यामुळे एका प्रशासकाला 2 ते 3 ग्रामपंचायतींचे काम सांभाळावे लागत आहे. शिवाय हे प्रशासक पंचायत समितीमधील विविध विभागांचे अधिकारी असल्याने त्यांना आपले मूळ पदाचे कामकाज सांभाळून अतिरिक्त काम करावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासकांना ग्रामपंचायतींच्या कामांसाठी पुरेसा वेळ देता येणार नाही.
विकासकामे खोळंबवणार निवडणूक आचारसंहिता लागल्याने गावाच्या विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींचा कारभार सांभाळणार्या प्रशासकांची संख्याही तुलनेने कमी असल्याने परिणाम गावातील विकासकामे खोळंबण्याचे शक्यता ग्रामस्थांना वाटते. या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत प्रशासकांनाच काम पाहावे लागणार आहे.
या ग्रामपंचायतीत प्रशासक आंबेशिवथर, कुंभेशिवथर, कसबेशिवथर, दहिवड, खर्डी, किंजळोली बु, तेटघर, वरंडोली, सांदोशी, निजामपूर, दाभोळ, कांबळेतर्फे महाड, वाकी बु, वाळण बु, पाने, आमशेत, वलंग, सोनघर, आकले, जीते, विन्हेरे, वसाप, शिंगरकोंड, पांगारी, रेवतळे, कुंभार्डे, आंबिवली बु, सव व भावे.







