। नेरळ । प्रतिनिधी ।
कोल्हारे येथे श्री क्षेत्र संगमेश्वर असून या तीर्थक्षेत्राचा विकास राज्य सरकारकडून सुरू झाला आहे. त्रिवेणी संगमावर असलेल्या परिसराचा विकास साधताना भक्तांसाठी खुले सभागृह आणि परिसराच्या सुरक्षेसाठी संरक्षण भिंत बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने दोन कोटींचा निधी मंजूर केला आहे. श्री क्षेत्र संगमेश्वर हे क्षेत्र नदी किनारी असल्याने पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने नदी किनार्याची धूप होते. त्यामुळे पर्यटन विकासमधून या ठिकाणी उल्हास नदीला संरक्षण भिंत बांधली जात आहे. या संरक्षण भिंतीचे काम सुरू झाले असून पावसाळ्याआधी भिंतीचे काम पूर्ण होणार आहे.
या ठिकाणी असलेल्या सभामंडपाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्याचवेळी तेथे खुले सभागृहदेखील बांधण्यात येणार आहे. ही सर्व कामे येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून कोल्हार येथे श्री क्षेत्र संगमेश्वर परिसराचा कायापालट होणार आहे. त्रिवेणी संगमावर असलेल्या परिसराचा विकास झाल्याने येणार्या भाविकांना प्रसन्न वाटणार आहे.