पावसाळी सुरक्षेसाठी शासनाचा निर्णय
| मुरुड- जंजिरा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील राजपुरी येथील सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला हा सोमवार (दि.26) पासून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे शेवटचा शनिवार, रविवारची सुट्टी साधून असंख्य पर्यटक किल्ला पाहण्यासाठी अलोट गर्दी करणार आहेत.
किल्ला पाहण्यासाठी औरंगाबाद, जालना, परभणी, कल्याण, डोंबिवली, बोरिवली आदी भागातून हजारो पर्यटक मोठ्या संख्येने येतात. मोठ्या प्रमाणात पर्यटक आल्याने किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ मोठी गर्दी होते. त्यातच पावसाळाजवळ आल्याने लाटांचा प्रवाह वाढला आहे. शिडाच्या बोटी हेलकावे घेत असल्याने किल्ल्याच्या तटावर उतरणे जिकरीचे होते. परंतु, थोड्या संयमाने पर्यटकांना किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ उतरावे लागते. त्यासाठी नूतन जेट्टी बांधण्यात आली आहे. परंतु, ती पावसाळ्यानंतरच सुरु होणार आहे.
किल्ल्यावर गर्दी होते म्हणून असंख्य पर्यटक शिडाच्या बोटींमधून किल्ल्यास प्रदक्षिणा घालून किल्ल्याचे रूप बाहेरून पाहण्यात समाधान मानतात. सध्या किल्ल्यावर तिकीट घेण्यासाठी सुद्धा मोठी गर्दी पहावयास मिळते. शेवटचा शनिवार, रविवार असल्याने किल्ल्यावर मोठी गर्दी ओसंडून वाहणार आहे. सोमवार पासून हा किल्ला तीन महिने बंद राहणार असून, सप्टेंबर महिन्यात पुन्हा याची दालने उघडणार आहेत. शिडाच्या बोटीवर काम करणाऱ्या लोकांना हा शेवटचा रोजगार असून त्यांना तीन महिने घरीच बसावे लागणार आहे. म्हणून जास्ती जास्त पर्यटकांना किल्ल्यात नेण्याचा प्रयत्न शिडाच्या बोटधारकांनी केला. किल्ल्यामागे नवीन जेट्टी तयार होत आहे. जेट्टी तयार झाल्यावर पर्यटकांना किल्ल्यात जाणे सहज सोपे होईल.
समुद्रातील सुरक्षिततेच्या कारणास्तव दरवर्षी जंजिरा जलदुर्ग 25 किंवा 26 मे पासून पर्यटकांना आतून पाहण्यासाठी बंद केला जातो. पर्यटकांची सुरक्षितता महत्वाची आहे. या कालावधीत समुद्राच्या मोठ्या लाटा उसळत असल्याने धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी शासकीय स्तरावरून निर्णय घेतला जातो. 26 मे पासून जंजिऱ्याचे दरवाजे बंद करावेत अशा स्वरूपाचे आदेश मेरिटाईम बोर्ड आणि पुरातत्व खात्याला प्राप्त झाले आहेत. त्यानुसार निर्णय घेतला जाईल.
बजरंग येलीकर
पुरातत्व विभाग अधिकारी
अलिबाग- मुरुड