वयाच्या 37 व्या वर्षी दहावीत मिळविले 69.20 टक्के गुण
। पाली । प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील दिव गावातील दिपिका म्हात्रे या गरिबी व अपंगत्वावर मात करत रायटर नाकारून स्वतः पेपर लिहून वयाच्या 37 व्या वर्षी दहावी उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांनी तब्बल 69.20 टक्के गुण मिळवून यश मिळवले आहे.
प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनच्या सेकंड चान्स प्रोग्राममधून शिक्षणाची संधी मिळवून आपली जीवन दिशा बदलणार्या महिलांपैकी त्या एक आहेत. दीपिका यांचे माहेरचे जीवन अतिशय गरिबीत गेले. त्यामुळे नववीपर्यंत शिक्षण घेता आले. आणि त्यांनतर लग्न झाले. परंतु, सासरीही परिस्थिती हालाखीचीच होती.
पती-पत्नी मजुरी करून घर चालवत होते. गर्भधारणेच्या वेळी त्यांना संधीवाताचा तीव्र झटका आला आणि त्यात 60% अपंगत्व आले. त्यांचे अपत्यही दोन्ही पायांनी अधू जन्माला आले. इतक्या संकटांमध्येही शिक्षणाची आस मनात टिकून होती, परंतु त्याग करावा लागला. प्रथम संस्थेच्या ‘हमारा गाव’ उपक्रमाअंतर्गत दिव गावात सर्वे करताना दिपिका भेटल्या. पहिल्याच भेटीत त्यांच्या डोळ्यात शिक्षणाची आस दिसली. प्रथमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विश्वास दिला, आणि त्यांना दहावीसाठी तयार झाल्या. त्यांनी दहावीचा अभ्यास दैनंदिन कामकाज करून घेऊन करून प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होत दिव्यांगांसह समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
पतीची मिळली साथ
पती व अनेकांची मदत प्रथम संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला त्यांच्याकडे जाऊन शिकवणे सुरू केले. त्यांना केंद्रावर येणे कठीण होते, परंतु त्यांचे पती त्यांना हात धरून आणायचे. नंतर इतर विद्यार्थी महिला त्यांना घेऊन यायच्या. त्यांनी कधीही वर्ग चुकवला नाही. अभ्यास नियमितपणे केला, ग्रुपवर होमवर्क पाठवत राहिल्या. त्यांना काही मजले चढून परीक्षा द्यावी लागायची, परंतु वर्गमित्र व मैत्रिणी त्यांच्या मदतीला धावून यायच्या.