। कोलाड । वार्ताहर ।
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून म्हणजे 6 मेपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून या सतत पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे भात शेती आडवी झाली आहे. हा अवकाळी पाऊस अजून तीन चार दिवस असाच सुरु राहिला तर भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल यामुळे शेतकरी वर्ग धास्तावला आहे.
कोलाड-खांब परिसतील शेतकरी ही डोळवहाळ धरणातून सोडण्यात येणार्या कलव्याच्या साह्याने पाणीपुरवठा करून अनेक वर्षांपासून उन्हाळी भात शेती करीत आहेत. यावर्षी कोलाड पाटबंधारे खात्यातून सोडण्यात आलेल्या पाण्यावर पुई, कोलाड, पुगांव, मूठवली, शिरवली, खांब, येथील शेतकर्यांनी भात शेती केली. हे भात पीक उत्तम प्रकारे आले असून कापणीसाठी तयार झाले आहे. परंतु, गेली पंधरा दिवसापासून सतत पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे भात कापणीसाठी विलंब होत आहे. यामुळे तयार झालेले उभे पीक सततच्या पावसामुळे आडवे झाल्याने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे.
ईडा पीडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे! असे बोलत येथील शेतकरी कोणतेही संकट आले तरी त्याला न डगमगता भात शेती करीत असतो. यामध्ये बियाणे, खते यांच्या वाढलेल्या किंमती, मशागतीचे कामे, मजूरांची कमतरता, यावर मात करीत येथील बळीराजा मोठ्या हिमतीने भात शेती करतो. परंतु, अंतिम टप्प्यात तयार झालेली भात शेती निसर्गाच्या एका कोपामुळे उध्वस्त होताना बळीराजा फक्त उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.