ॲड. मानसी म्हात्रे यांनी सक्तीच्या धोरणाविरोधात व्यक्त केला निषेध
| अलिबाग | प्रतिनिधी |
आधुनिकतेच्या नावाखाली सर्वसामान्य ग्राहकांना सक्तीने स्मार्ट मीटर लादले जात आहे. महावितरण कंपनीच्या या मनमानी कारभाराविरोधात शेतकरी कामगार पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. सक्तीच्या मीटर धोरणाविरोधात ॲड. मानसी म्हात्रे यांनी निषेध व्यक्त करीत सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन पुकारणार असल्याचा इशारा त्यांनी निवेदन देऊन केला.
यावेळी शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, अलिबाग तालुका कार्यालयीन चिटणीस अशोक प्रधान, अलिबाग शहर प्रमुख अनिल चोपडा, अलिबाग शहर सहप्रमुख तुषार वाईकर, अलिबाग शहर महिला प्रमुख ॲड. निलम हजारे, अलिबाग शहर सहप्रमुख अश्वीनी ठोसर, अलिबाग शहर पुरोगामी प्रमुख कपिल अनूभवणे, अलिबाग शहर सांस्कृतिक सेल प्रमुख नंदकुमार तळकर, अलिबाग तालुका कामगार आघाडी संजय माळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागासह शहरी भागात विजेचे जाळे ठिकठिकाणी पसरले आहे. वीज ही सर्वसामान्यांसाठी गरज बनली आहे. मात्र, याचाच फायदा घेत महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनीकडून गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांना स्मार्ट मीटर सक्तीने घेण्याचा घाट सुरु केला आहे. जूने मीटर सुरळीत चालू असताना देखील या मीटर ऐवजी स्मार्ट मीटर घेण्यास भाग पाडले जात आहे. या स्मार्ट मीटरचा आर्थिक भार सर्वसामान्यांवर पडणार आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड त्यांना सोसावा लागणार आहे. स्मार्ट मीटर बसविताना स्वतंत्र आकारणी एक हजार 800 रुपये वसूल केले जाणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांची होणारी आर्थिक लुट थांबविण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. सक्तीच्या स्मार्ट मीटर धोरणाला जोरदार विरोध करीत शेकापच्या राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले.