| मुंबई | प्रतिनिधी |
देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत. विवेक फणसाळकरांच्या निवृत्तीनंतर देवेन भारती यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तपद देण्यात आलं आहे. विवेक फळसाळकर हे आज 30 एप्रिल रोजी निवृत्त झाले. त्यांच्यानंतर आयुक्तपदासाठी सदानंद दाते, संजयकुमार वर्मा, रितेश कुमार, महिला पोलीस अधिकारी अर्चना त्यागी यांच्या नावाची चर्चा होती. याशिवाय देवेन भारती यांच्याकडेही या पदाची धुरा दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. विवेक फणसाळकर यांनी 30 जून 2022 मध्ये मुंबई पोलीस आयुक्तपदाची धुरा स्वीकारली होती. देवेन भारती हे 1994 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
देवेन भारती यांनी महाराष्ट्र पोलिस दलात विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. 4 जानेवारी 2023 रोजी देवेन भारती यांची मुंबई पोलिस दलाच्या इतिहासातील पहिल्या विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली. हे पद नव्याने निर्माण करण्यात आले असून सर्व सहपोलीस आयुक्त त्यांना अहवाल देतात, तर ते मुंबई पोलीस आयुक्तांना अहवाल देतात. देवेन भारती यांनी यापूर्वी सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था), अतिरिक्त पोलीस महासंचालक (दहशतवाद विरोधी पथक) आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक यांसारख्या महत्त्वाच्या भूमिका सांभाळल्या आहेत. डिसेंबर 2022 मध्ये ते सहपोलीस आयुक्त (वाहतूक) म्हणून कार्यरत होते. देवेन भारती यांचा 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या तपासात सहभाग होता. त्याचबरोबर मिड-डे वृत्तपत्राचे वरिष्ठ गुन्हे संपादक जे. डे यांच्या हत्येच्या तपासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा कणा मोडण्यात त्यांचे योगदान मानले जाते.
देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती
